Friday, December 15, 2017

अशौच (सुतक) असताना किंवा स्त्रियांच्या मासिक धर्मात जप केला तर चालतो का?

  🌹🌷🌹 " नामप्रेमचिंतन "  🌹🌷🌹

शंका- जय श्रीराम, एक शंका विचारायची होती ती म्हणजे अशौच(सुतक) असताना किंवा स्त्रियांच्या मासिक धर्मात जप केला तर चालतो का? आणि नसेल तर का? एका गुरुबंधूंनी मागे काही महिन्यापूर्वी हा प्रश्न मला विचारला होता,परंतु मला समर्पक असे उत्तर देता आले नाही.


श्रीराम! अनेक स्त्रियांनी आतापर्यंत हा प्रश्न विचारला आहे. नवविधा भक्तीमध्यें तसेच यज्ञयाग, तिर्थयात्रा इ मध्ये देह, स्थळ, काळ याच्या मर्यादा, विधिनिषेध अध्यात्मशास्त्रात सांगितले आहेत. ते पाळून ती साधना केली तर इप्सित कार्यसिद्धी होते आणि त्यात काही प्रमाद घडले तर नको तो परिणाम होतो.

परंतु, नामस्मरण हा साधनमार्ग देहाच्या तसेच स्थलकालाच्या मर्यादेबाहेर आहे. किंबहुना, नामस्मरण हे कुणीही, कधीही, कुठेही, कशाही अवस्थेत घेतलं तरी त्याची अनुरूप फलश्रुती मिळते! "नाम हा माझा प्राण आहे!" असं अभिवचन देणाऱ्या संतपरंपरेत आपण जन्माला आलेलो असल्यानें जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंत नाम घेत राहणे, हाच विधी आणि क्षणभरही नामाचं विस्मरण हाच निषेध आपल्या संप्रदायात सांगितला आहे! श्वासासारखं नाम, श्वासावर नाम आणि पुढे नामावर श्वास हे चिंतन आपण काही दिवसांपुर्वीच बघितलं. सुतक किंवा अशौच काळात जर आपण श्वासादी कर्म चालूच ठेवतो, मग नाम का थांबवावं?

इतर भक्तीसाधनेत सर्वांगिण शुचिता जरूर आहे. परंतु, नामस्मरणासाठी देहशुद्धीपेक्षा चित्तशुद्धी असणे जास्त जरूर आहे. शुद्ध अंतःकरणानें केंव्हाही नाम घेतलं तर त्यात रामच असेल. परंतु, देह शुचिर्भूत करून, सोवळं नेसून पण अशुद्ध हेतूनें नाम घेतलं तर त्यात राम नाही काम असेल!

थोडक्यात, नामस्मरणासाठी शुद्ध भाव हीच प्रमुख अट आहे. आता ते नामस्मरण जर अनुष्ठानात्मक असेल किंवा बिजमंत्र असेल तर त्याला काही विधिनिषेध असतात. तेंव्हा, असे मंत्र इ. अशौच काळात म्हणू नयें. परंतु, रामनामाला ही मर्यादा नाही.

फक्त, या कालावधीत माळेवर न करता केवळ मानसिक केलेला जप आपल्या संकल्पित जपसंख्येत गृहीत धरू नयें! बाकी मग,
।। नाम स्मरें निरंतर । ते जाणावें पुण्यशरीर ।।


         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏

No comments:

Post a Comment