Sunday, December 24, 2017

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । या माऊलीच्या अभंगातील उपदेश सांगाल का?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका- माउलींच्या या अभंगांचा अर्थ व यांतील उपदेश सांगाल का...

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥
चरणकमळदळू रे भ्रमरा । भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥
सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥
सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा । बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥


श्रीराम! ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर भाष्य करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे.

आपण त्याला फक्त हात जोडू शकतो! तेंव्हा, माझं चिंतन हे हात जोडण्यासारखं समजावं....

आपल्याकडे दहावी झाल्यावर मुले कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखा निवडून त्यात शिक्षण घेतात. आणि मग पुढील ७-८ वर्षाच्या बौद्घिक परिश्रमानंतर एखाद्या विषयात तथाकथित मास्टर ही पदवी मिळवतात! दहावी झालेला विद्यार्थी १६-१७ वर्षाचा असतो. उद्या वयात आजकालची मुलं कला, वाणिज्य की विज्ञान यांत गोंधळलेली असतात, त्याच वयात ७०० वर्षापुर्वी एका कोवळ्या मुलाने जे लेखन केलं त्यात जगातील ज्ञानाच्या सर्व शाखा आहेत. एवढ्या कमी वयात एवढं अकल्पित एवढ्या उच्चकोटीचं तत्वज्ञान मांडणारा मुलगा ज्ञानार्थी नसून ज्ञानाचा अधिपती, ज्ञानेश्वर म्हणून ओळखला जातो. याच समग्र लेखनवृक्षातील एक संजीवन पान म्हणजे वरील अभंग! वरील एकाच अभंगात जीवन जगण्याची कला आहे, यशस्वी वाणिज्य आहे आणि अद्भुत विज्ञान देखील आहे!

माऊलींनी आवाहनपर हा अभंग रचला आहे. यात साधकाने आपली साधनदिशा निर्धारित करण्यासाठी, ती अंततोगत्वा समाधान देणारी बनवण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे अतिशय कलात्मक पद्धतीने माऊलींनी या अभंगात सांगितलं आहे. सर्व परिस्थितीत समाधान हे सर्वांचं साध्य आहे. आणि आपली साधना या साध्याप्रत पोचण्यासाठी मानवदेह हे माध्यम आहे. या देहरुपी रथावर आरूढ होऊन जीव शिवाप्रत पोचण्यासाठी प्रयत्न करीत असतो. मार्गातील सर्व अडथळे पार करून रथ योग्य दिशेला सुखरूप जाण्यासाठी सारथी चांगला हवा!

देहाला जर रथ मानलं तर या रथाचा सारथी कोण? तर देहरुपी रथावर वाटेल तिथे नेण्याची क्षमता असलेला हा सारथी म्हणजे "मन"! तर देहरुपी रथाला वाटेल तिथे नेण्याची क्षमता असलेला हा सारथी म्हणजे "मन"! त्यामुळें, माऊलींनी आवाहनपर हा अभंग रचतांना मनरुपी सारथीला आवाहन केलं आहे. अध्यात्माचं गुढ तत्वज्ञान सुंदर परंतु दैनंदिन उपमा वापरून लडिवाळपणे मांडणे हा ज्ञानेश्वर महाराजांचा स्थायीभाव आहे. हा लडिवाळपणा जपतांनाच माऊलींनी या अभंगात मनाला भ्रमराची उपमा दिली आहे. माऊलींचं काव्य काही ठिकाणी जड वाटतं, अगम्य वाटतं. परंतु, त्यातील महत्वाचा शब्द स्पष्ट झाला की संपुर्ण अभंग किंवा ओवी सहजपणे उलगडते.

तेंव्हा, या अभंगातील महत्वाचा शब्द म्हणजे "भ्रमर"! आणि या अभंगात मनाला भ्रमराची उपमा दिली आहे, हे समदलं की अर्ध काम झालं! आपल्याला मनाचा स्वभाव माहीत आहे. सतत इकडून तिकडे, तिकडून इकडे भ्रमण करते ते मन! आणि म्हणूनच मनाला सतत रुणुझुणु रुणुझुणु करणाऱ्या भ्रमराची उपमा दिली आहे. जोपर्यंत मन एका ठिकाणी स्थीर होत नाही, तोपर्यंत जीवाला समाधान नाही. अकारण नको तिथे भ्रमण करणे हा मनरुपी भ्रमराचा सर्वांत मोठा अवगुण आहे. हा अवगुण सोडण्याचं आवाहन करतांना माऊली म्हणते:
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडी तुं अवगुणु रे भ्रमरा ।।

एखादा खोडकर मुलगा असेल तर त्याला हे करू नको, ते करू नको असं सतत सांगावं लागतं. मग तो मुलगा म्हणतो, हे करू नको, ते करू नको, मग करू तरी काय? या मनरुपी भ्रमराची तीच अवस्था झाली आहे. क्रोधाकडे जाऊ नको, कामाकडे जाऊ नको, लोभाकडे जाऊ नको, मत्सराकडे जाऊ नको, मग जाऊ तरी कुठे? तर माऊली त्या भ्रमराला म्हणते, तु ज्या ५-६ ठिकाणी जातोस, ते गटार आहे, तिथे समाधानाचा सुगंध नसून विषयभोगाची दुर्गंधी आहे. तुला खरा सुगंध जे पूर्ण समाधानी आहेत त्या कमळात मिळेल!

माऊलींनी जसं भ्रमर म्हणजे मन म्हंटले आहे, तसे कमळ कुणाला म्हंटलं आहे? तर संतांना! या संतरूपी कमळाच्या चरणी गेल्यावरच मनरुपी भ्रमराला खरं निश्चल, अखंडीत समाधान भोगायला मिळेल!
चरणकमळदळू रे भ्रमरा । भोगी तूं निश्चळू रे भ्रमरा ।।

जसं भ्रमराची भ्रमंती कमळाच्या कुशीत गेल्यावर कायमची थांबते, त्याप्रमाणें संत सद्गुरूंच्या चरणरजाचा विषयी माणसाच्या मस्तकावर अभिषेक झाला की वासनेचं बीज जळून वासनेकडचं भ्रमण कायमचं थांबतं!

संतचरणरज लागता सहज ।
वासनेचं बीज जळूनी जाय ।।
तुलसीदासानें मनाला मुकुर म्हणजे आरसा म्हंटलं आणि तो स्वच्छ करण्यासाठी श्रीगुरूचरण सरोजरज, निजमन मुकुर सुधारी। सांगितलं! यांत माऊलींनी जसं संतांना कमळाची उपमा देतांना चरणकमळदळू म्हंटलं, त्याप्रमाणें तुलसीदासानें सद्गुरूंना सरोज म्हणजे कमळाची उपमा देतांना श्रीगुरूचरण सरोजरज म्हंटलं!

या ओवीत भोगी तूं निश्चळू म्हणतांना भगवंतानें गीतेमध्ये 'स्थीरधी' हा जो गुण सांगितला आहे, तोच माऊलींनी या ठिकाणी मांडला आहे! जो भ्रमर अगोदर घाणीत फिरल्यानें घाणेरडा, दुर्गंधी बनला होता, तोच जेंव्हा कमळात विसावतो तेंव्हा सुगंधानें न्हाऊन निघतो. त्याचप्रमाणे विषयाच्या, विकारांच्या घाणीत फिरल्यानें जे मन दूषित झालं होतं, तेच मन गुरूचरणी लागल्यावर 'सुमन' बनतं आणि त्यातून भक्तीप्रेमाचा सुगंध येऊ लागतो.
सुमनसुगंधु रे भ्रमरा ।।
सुमन म्हणजे फुल आणि सुमन म्हणजे चांगले मन! कमळाच्या सहवासानें भ्रमराला कमळाचा सुगंध लागतो, त्याचप्रमाणे संतांच्या सहवासानें साधकाला संतांचा भक्तीप्रेमाचा सुगंध लागतो. तो सुगंध, तो परिमल विद्गदु म्हणजे साधकाला सद्गदित करून परमानंदाचा अधिकारी बनवतो. मनाची ही अवस्था येण्यासाठीच माऊली म्हणते,
सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ।।
विद्गदु चा व्यावहारिक अर्थ आहे पसरवणे! जो भक्तीप्रेमाचा परिमळ मला संतरूपी कमळाच्या सहवासानें लाभला तो मी पसरवला पाहिजे! श्रीमहाराजांचं "नाम सदा बोलावें, गावे भावे, जनांसि सांगावें" हे 'परिमळु विद्गदु'च्या समकक्ष वाटतं! मनरुपी भ्रमराने कमळाच्या सहवासात जाणें म्हणजे 'चरणकमळदळू रे भ्रमरा' म्हणजेच 'नाम सदा बोलावें'! कमळाच्या सहवासात राहून सुगंध घेणे म्हणजेच 'सुमनसुगंधु रे भ्रमरा' म्हणजेच"भावे गावे!" आणि
भ्रमराला मिळालेला सुमनसुगंधु त्यानें इतरांना देणे म्हणजेच 'परिमळु विद्गदु' म्हणजेच 'जनांसि सांगावें'! मला जो नामाचा सुगंध लाभला, तो मी तर घ्यावाच, पण मी त्यात न्हाऊन निघतांना इतरांना त्यात खेचणें हे साधकाच्या जीवनाचं ध्येय असावं, असं माझं मत आहे.
नामालय चा जन्म याच 'परिमळु विद्गदु'च्या ध्यासानें झाला आहे! विद्गदु चा व्यावहारिक अर्थ आहे पसरवणे!
जो भक्तीप्रेमाचा परिमळ मला संतरूपी कमळाच्या सहवासानें लाभला तो मी पसरवला पाहिजे!
अशा रितीनें मनरुपी भ्रमर जेंव्हा अंतर्बाह्य भक्तीप्रेमाचा सुगंध बनतो, तेंव्हा त्याचं भगवंताशी नातं बदलून
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हा नारायण तैशापरी ।। असं होतं!
ही अवस्था सांगतांना माऊली म्हणते, हे भ्रमरा हा संतरूपी कमळाचा सुगंध हेच तुझं सौंदर्य, हेच तुझं सौभाग्य!
आणि सद्गुरूंना सौभाग्य मानून सद्गुरूंनी ज्याची भक्ती केली त्या भगवंताला मायबाप मान!
सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा । बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ।।
फुलांचा अर्क काढून अत्तर बनवतात. तसं या अभंगाचा अर्क म्हणजे सौभाग्य! आणि हे सौभाग्य, हे अत्तर म्हणजेच सद्गुरूंनी सिद्ध करून दिलेलं भगवंताचं नाम! हे नामांचं सौभाग्य ज्याच्याकडे आहे, तो खरा भाग्यवान! आणि तो जिथे जाईल तिथे हे नामरुपी अत्तर वातावरण सुगंधीसुंदर बनवेल!  तेंव्हा हे अत्तर केवळ वरवर न लावता अंतःकरणात ठसवावं! तो ठसा स्वह्रदयात ठसावा! बस्स! लाभ नाही यापरता!
।। ज्ञानेश्वर माऊली की जय ।। 


         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏 

No comments:

Post a Comment