Saturday, December 23, 2017

स्मरणी समजा एखाद्याला दिसली तर काही प्रॉब्लेम नाही ना?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷


शंका- जप करताना आपल्याकडे असलेली स्मरणी समजा एखाद्याला दिसली तर काही प्रॉब्लेम नाही ना? परमार्थ गुप्त असावा असे ऐकले होते.

श्रीराम! अगदी बरोबर बोललात! स्मरणी एखाद्याला दिसू नयें. मात्र तो एखादा म्हणजे आजुबाजुचे लोक नाही तर ती स्मरणिका ज्याच्याजवळ आहे तो! ज्याच्या हातांत माळ किंवा स्मरणिका आहे, त्याला ती दिसली तर त्याला वाटेल 'मी' नाम घेतोय! आणि हा 'मी' चा अभिमान सर्वांत घातक आहे. अभिमान शत्रू मोठा। जर मी माझा 'मी' विसरून नाम घेऊ लागलो तर बाहेरच्या लोकांनी बघितलं तर काही फरक पडणार नाही!

काय गंमत असते बघा, जेंव्हा आजुबाजुचे लोक इतर काम करतांना आपलं नामस्मरण सुरू असतं, तसेंच सामुहिक नामजपात बसलो तेंव्हा सुद्धा आपलं नामस्मरण सुरू असतं. परंतु, या दोन्ही नामस्मरणांत अवतरण चिन्हाचा भेद असतो!

आजुबाजुचे लोक काम करतांना आपलं नामस्मरण सुरू असेल तर आपल्याला वाटतं, "मी" नाम घेतोय!

परंतु, सामुहिक नामजपात सर्वांसोबत आपलं नामस्मरण सुरू असेल तर आपल्याला वाटतं, मी "नाम" घेतोय! दोन्हीमध्यें बाह्यांगानं क्रिया तीच, पण एकीकडे 'मी'चं प्राबल्य, तर दुसरीकडे "नामाचं"!

पहिल्या प्रक्रियेत 'मी' प्रबल का होतो? तर लोकांची दृष्ट लागल्यानें नाही तर लोकांनी ते बघितल्यावर जेंव्हा म्हंटलं की 'तुम्ही नामस्मरण करताय!' तेंव्हा तुमचा 'मी' जागा होतो व म्हणतो, हो 'मी' नाम घेतोय! आणि म्हणूनच श्रीमहाराजांनी म्हंटलं की परमार्थात दृष्ट इतर कुणाची लागत नसून 'स्वतःची' लागते.

तेंव्हा, स्मरणिका, माळ किंवा नामसाधना एखाद्याला म्हणजे 'मी'ला दिसू नयें; आपली स्मरणिका, माळ किंवा नामस्मरण एकालाच दिसावं. तो एक म्हणजे "तो"! नामसाधना नामधारकाला न दिसता नामदात्याला, सद्गुरूंनाच दिसणं म्हणजे 'नाम'साधलं! 

*"मी" नाम घेतोय! - बद्धावस्था*

*मी "नाम" घेतोय! - सिद्धावस्था*


         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏 

No comments:

Post a Comment