Wednesday, December 13, 2017

काली कमलीवाला' याचा शाब्दिक आणि अध्यात्मिक अर्थ काय?

 🌹🌷🌹*" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹

*शंका*- 'लाडला कन्हैय्या मोरा काली कमलीवाला' याचा शाब्दिक आणि अध्यात्मिक अर्थ काय? 🙏🏻

श्रीराम! काली कमली वाला म्हणजे योगी! कमली म्हणजे घोंगडी असा एक व्यावहारिक अर्थ आहे. परंतु, अध्यात्मिक अंगानें विचार करता कमली म्हणजे आत्यंतिक वासना. आपल्या सर्व वासनांना (कमलीला) काळ फासणारा तो काली कमलीवाला! श्रीकृष्ण परमात्म्याला काली कमलीवाला म्हणण्याची दोन कारणं आहेत....
पहिलं कारण म्हणजे श्रीकृष्ण हा रसेश्वर असला तरी त्यानें कशातही आसक्ती ठेवली नाही. गोकुळांत गोप-गोपिकांसोबत रममाण झालेला कान्हा जेंव्हा मथुरेला गेला तेंव्हा पुन्हा त्यानें मागे वळून पाहिलं नाही. आपला जीव कशांतही अडकून ठेवायचा नाही, हा आदर्श त्यानें प्रस्थापित केला. कमली म्हणजे घोंगडी असा अर्थ घेतला तर भगवंतानें काळी घोंगडी परिधान केली जेणेकरून त्यावर दुसरा कोणताही (विकाराचा, आसक्तीचा) रंग बसणार नाही!
आणि आपण बघितलं की बालपणापासून नाना तऱ्हेच्या लीला करून, विविध रंगात रंगूनही जेंव्हा हा नटखट कान्हा कुरूक्षेत्राच्या रणांगणावर उभा राहिला तेंव्हा त्यानें सर्व लीला बाजुला सारून, बासरीला कंबरेत खोचून एका अनासक्त, विरक्त ज्ञानी सत्पुरूषाप्रमाणें अद्भुत योग प्रगट केला. त्याक्षणी, त्याच्या देहावर कोणत्याही ममतेचा, आसक्तीचा पाश नव्हता!
यात एक अतिशय सुक्ष्म गोष्ट आपण ध्यानांत घ्यायला हवी. ती म्हणजे मुळातच अनासक्त, निर्मोही राहणं हे अशा पुरूषाला जमू शकतं जो सर्व सद्गुणांत उत्तम आहे. असा निर्मोही पुरूषोत्तम म्हणजे श्रीराम!
आणि याच ठिकाणी कृष्ण रामाला भारी पडतो. मुळातच कशातही मोह न ठेवणं हे पुरूषोत्तमाचं लक्षण आहे; परंतु सर्व गोष्टींत अडकून त्यातून अलगद बाहेर पडणं हे योगपुरूषाचं लक्षण आहे. आणि श्रीकृष्ण हा योगपुरूष आहे!
मला असं वाटतं की, रामावतारात मर्यादेचं प्राबल्य दाखवायचं होतं म्हणून भगवंतानें अंतर्बाह्य निर्मोही जीवनदर्शन घडवलं. परंतु, कृष्णावतारात मायेचं प्राबल्य दाखवायचं होतं म्हणून भगवंतानें मोह न आवरता मायेच्या लीला केल्या. परंतु, या मायेच्या लीला करतांना देखील भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हा पाठ मनुष्याला देण्यासाठी भगवंतानें आवश्यक तेंव्हा सर्व मोहाला तिलांजली देऊन कर्मयोगाचं श्रेष्ठत्व प्रतिपादित केलं! आपलं कर्तव्य, कर्म अनासक्तीनें, निरपेक्षपणें करणे हे कौशल्य म्हणजेच योग! योगः कर्मसु कौशलम्।
जे रामावतारात जगून दाखवलं, तेच भगवंतानें खेळकर वृत्तीनें कृष्णावतारात शिकवलं! आणि हे कौशल्य खेळकर वृत्तीनें आपल्या अंगी येण्यासाठी एका वेळी अंगावर एकच घोंगडी परिधान करावी. प्रपंच करतांना तो असा करावा की लोकांना वाटावं याच्यासारखा यशस्वी प्रापंचिक कुणी नाही; आणि परमार्थ करतांना तो इतक्या तन्मयतेनं, निष्ठेनं करावा की लोकांना वाटावं याच्यासारखा श्रद्धावान भक्त कुणी नाही! एकावेळी एकच घोंगडी!
या घोंगडीवर दुसरा कोणताही विकाराचा रंग येऊ नयें म्हणून सर्वात गडद रंग यावर द्यावा. तो रंग काळा! म्हणून कृष्णाचा रंग काळा! त्यावर कोणताही रंग टाकला तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. असा हा श्रीकृष्ण निर्वासनतेची काळी घोंगडी परिधान केलेला असल्यानें आपण त्याला काली कमलीवाला म्हणतो!
त्याला काली कमलीवाला म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे तो ती काली कमली केवळ स्वतःच परिधान करतो असं नाही तर जो मनुष्य कोणतीही वासना न ठेवता प्रपंच आणि परमार्थ करेल त्याला तो ती घोंगडी देऊन कृष्णमय करून टाकतो! आणि ती पात्रता आपल्या अंगी येण्यासाठी आपण म्हणजे साधकानें निर्वासनेने साधना करावी. म्हणजे "महाराज, मला काही नको. फक्त माझ्या मुलांना सुखी ठेव, त्यांचं कल्याण कर!" हे सुद्धां मागू नयें.
मी साधना केल्यावर भगवंत किंवा महाराज माझ्या मुलांचं कल्याण करणार नाही का? मी फारसं साधन न करता ज्यांनी माझं कल्याणच केलं त्या सद्गुरूंना कल्याण करा हे का शिकवावं? हा स्वार्थ तरी का ठेवावा? या मागणीने माझ्या साधनेला कमीपणा नाही का येणार? याचा विचार आपण करावा!
तेंव्हा, सर्व साधकांच्या चरणी मनःपुर्वक विनम्र प्रार्थना आहे की, प्रपंचात एकवेळ चालेल, पण साधनेत स्वार्थ किंवा अपेक्षा नको. या स्वार्थाला, वासनेला तिलांजली देऊन कर्मयोग्याचं जीवन जगणं म्हणजेच काली कमलीवाला बनणें!
कमली तर प्रत्येक मनुष्याकडे आहेच, पण त्यावर सर्वात गडद रंग लावावा. आणि सर्वांत गडद रंग जर कोणता असेल तर तो म्हणजे भगवंताच्या नामाचा! हा नामाचा रंग इतर सर्व विकारांना परतवेल आणि जीवनाचा बेरंग होण्यापासून वाचवेल! काली कमलीवाला बनण्यासाठी
*मना वासना वासुदेवी वसो दे ।*
*मना वासना कामसंगी नसो दे ॥*
*मना कल्पना वाउगी ते न कीजे ।*
*मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥*
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

1 comment:

  1. विवेक वैद्यDecember 15, 2017 at 9:19 PM

    वा. फारच सुंदर विवेचन. ..

    ReplyDelete