Wednesday, December 13, 2017

पैसा फार छळतो हो! याला काय करावे ?

 🌹🌷🌹*" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹

*शंका*- "पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आलें असें योगवसिष्ठांत वर्णन आहे. तसें ते आपल्यालाही लागू आहे. पण फरक एवढांच कीं, रामाचें उदासपण पैसा 'असणेंपणा'चे आहे आणि आपलें उदासपण पैसा 'नसणेंपणा'चे आहे !"
हे बोधवचन खूप आवडले परंतु पैसा फार छळतो हो! याला काय करावे 😔

*श्रीराम:-*
पैसा छळतो, हे खोटं बोलताय तुम्ही!
मग कोण छळतो.. तत्संबंधी विचार का ?
श्रीराम! एक सत्पुरूष रस्त्याने जात असतांना त्याला एका मनुष्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तो मनुष्य 'वाचवा, वाचवा! मला सोडवा!' असं ओरडत होता...
सत्पुरूषानें जाऊन पाहिलं तर हा मनुष्य एका झाडाला बिलगून मदतीसाठी ओरडत होता. सत्पुरूषानें त्याला अडचण काय आहे विचारल्यावर तो मनुष्य म्हंटला, मला या झाडापासून सोडवा, त्यानें मला धरलं आहे!
वास्तविक झाडानें त्याला धरलेलं नसून त्यानेंच झाडावा धरलं आहे!
पैसा हा जड आहे, तर मनुष्य चेतन! जड वस्तू चेतनाला कशी छळू शकेल?
तुमच्या काडीपेटी दिली ती कशासाठी? काडी पेटवून चुलीत टाकण्यासाठी. ती पेटलेली काडी स्वयंपाक सुंदर करेल. परंतु, तीच पेटती काडी स्वतःच्या घरावर टाकली तर ती 'तुमच्यासकट' घर जाळेल! आणि मग आपण म्हणतो की, या काडीनें माझं घर जाळून टाकलं!
जाळणें हा काडीचा गुण आहे, पण घर जळालं तर तो काडीचा दोष नसून त्या काडीचा वापर करणाऱ्याचा तो दोष आहे!
विनियोग करणें हा पैशाचा गुण आहे, पण समाधान भंग पावलं तर तो पैशाचा दोष नसून त्या पैशाचा वापर करणाऱ्याचा तो दोष आहे!
इकडे आड, तिकडे विहीर आपणच खोदलेली आहे. तरी, यांवर दोन उपाय आहेत :
१) दोन्हीच्या मध्यभागी संतुलन सांभाळून उभं रहा. (हा योगमार्ग आहे)
हा जमत नसेल तर
२) पोहायला शिकून आडात किंवा विहिरीत उडी मारा, जेणेकरून पाणी उपभोगता येईल, बुडण्याची भिती नसेल आणि पोहण्याचा आनंदही मिळेल! हा भक्तीमार्ग आहे. नामस्मरण कला शिकून प्रपंचांत उडी मारावी, जेणेकरून प्रपंच उपभोगता येईल, त्यात बुडण्याची भिती नसेल आणि सुखदुःखाची मजा बघता येईल!
ज्याला नीट पोहता येत नाहीं, त्यानें विचार न करता उडी मारली तर नाकातोंडात पाणी जाऊन बुडून मरेल तो! परंतु, यावर सुद्धां उपाय आहेच : भोपळा बांधायचा 😊
जो पोहण्याच्या बाबतीत ठोंब्या आहे, त्यानें हा भोपळा बांधून हातपाय हलवावें. हा भोपळा म्हणजे संतसंग!
कारण,
*संतसंगेवीण काय वाया जाय सर्वही।।*
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

No comments:

Post a Comment