Wednesday, December 13, 2017

नाम मनातून यायला काय करावे?‬‬‬‬

 🌹🌷🌹*" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹

*शंका*- नाम मनातून यायला काय करावे?‬‬‬‬

*श्रीराम!* दोन अंगांनी बघुया,
१) पाण्याच्या टाकीचा नळ सुरू केला की त्यातून पाणीच येणार. त्यातून दुध मिळावे असं वाटत असेल तर अगोदर टाकी रिकामी करून त्यात दुध भरावं लागेल.
त्याचप्रमाणें, मनाचा नळ सतत सुरू असतो आणि त्यातून विकार येत असतात. कारण, त्या मनाच्या टाकीत विकारच भरलेले आहेत. मनांतून नाम यावें असं वाटत असेल तर अगोदर मनाच्या टाकीतून विकार काढून त्यात नाम भरावं लागेल, म्हणजे मग मनाचा नळ केंव्हाही सुरू करा, मनांतून नाम येईल!
२) एखाद्या विहिरीत पाणी नसेल तर पोहऱ्याला दोष देऊन उपयोग नाही. प.पु. सद्गुरू श्री प्रल्हाद महाराजांच्या अर्धांगिनी पु. जिजीमाय यांचा एक प्रसंग याठिकाणी सांगावासा वाटतो...
अकोला येथे एक गंग्रस नावाचं कुटुंब महाराजांचं अनुग्रहीत. नियमितपणें उपासना, नामस्मरण करणारं. एकदां पु. जिजीमाय त्यांच्याकडे आल्या होत्या. घरातलं पाणी संपलेलं होतं, त्यामुळें बाहेरच्या विहिरीतून पाणी काढायला एकजण गेला, पण विहिरीतून पाणीच येईना. मायबाईंना हे ध्यानांत आलं. त्या म्हंटल्या, "मला एका टोपल्यात बसवून विहिरीत सोडा, बघुया विहिरीतून पाणी कसं येत नाही ते!"
त्याप्रमाणें त्यांना शिष्यांनी नामाच्या गजरात विहिरीत सोडलं. खाली गेल्यावर मायबाईंनी ज्या ठिकाणीं झरा बंद होता, तिथें मोठ्या नामाचा जयजयकार करून हात घातला. आणि हात काढल्याबरोबर पाण्याचा ओघ सुरू झाला. कालांतरानें, काही तासांमध्ये विहीर पाण्यानं भरली. आजही त्या विहिरीत भरपूर पाणी आहे!
आपल्या मनातून नाम येत नाहीं म्हणजे आपल्या अंतःकरणातील भगवद्प्रेमाचा झरा बंद आहे. मनांत नाम आहेच. परंतु, विषयप्रेमामुळे ज्या चित्तरुपी झऱ्यातून ते नाम यायला हवं तो झरा दबून गेला आहे. तो उघडण्यासाठी आपल्या गुरूमाऊलीला या देहरुपी विहिरीत उतरण्याची विनवणी करा, मग ती स्वतःच्या साधनशक्तीने तो झरा उघडेल. आणि मग त्या प्रेमाचा झरा उघडता क्षणी मनांतून नाम ओसंडून वाहू लागेल. त्या नामप्रेमानें मग घरातील सर्वांची पुष्टी, तुष्टी आणि क्षुधानिवृत्ती होईल! आपली शक्ती कमी पडत असेल तर सद्गुरूंची नामातील शक्ती वापरावी. त्यांना आर्ततेनं हाक मारून सांगावे की,
*अधिकारी नाही जरी मी। शक्ती न काय नामी।*
*मग काय मार्ग चुकला । कधी भेटसी दयाळा ।*
*या दीन किंकराला कधी भेटसी दयाळाsss*
मग बघा, मनांतून नाम येईल!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

No comments:

Post a Comment