





शंका - कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् । करोमि यद्यत्सकलं परस्मै । गुरुवरायेति समर्पयामि ॥ यातील तिसऱ्या चरणाचा मतितार्थ सांगावा.
➡
श्रीराम! यातील तिसरी ओळ हा सेवामार्गाचा प्राण आहे! भक्ती दोन प्रकारे करता येते: १) साधन भक्ती २) निःसाधन भक्ती
साधन भक्तीमध्यें पुजाअर्चा, स्तोत्र पठन, नैवेद्य, आरती, तिर्थयात्रा, यज्ञयाग इ. अनेक उपप्रकार येतात. परंतु, कलियुगात विषयी माणसाकडे वरील सर्व साधनांना आवश्यक असलेली पात्रता नाही आणि क्षमताही नाही. ती सर्व साधनं मोक्षदायिनी आहेतच, पण त्यातील अनेक साधनं आज तमोगुण, रजोगुणप्रधान परिस्थितीमुळे नष्ट तरी झाली आहेत किंवा दूषीत तरी झाली आहेत.
अशा प्रतिकुल काळात जेंव्हा साधक पात्रता अपात्रता, योग्यता अयोग्यता या द्वंद्वात अडकतो, तेंव्हा साधनेत बाधक तत्व येतात. परंतु, साधकानें करोमि यद्यद सकल कर्म त्याला समर्पित केले तर भगवंत पात्र अपात्र हा विचार न करता त्या जीवावर कृपा करतात. त्याला श्रीमद्भागवत ग्रंथात पोषण असं म्हंटलं आहे. यालाच "निःसाधन भक्ती" असे म्हंटले जाते!
निःसाधन भक्तीमध्यें प्रेमभाव प्रबळ असतो. यात भक्ताला विशेष प्रयत्न करावा लागत नाही. साधन भक्ती ही मर्यादा भक्ती आहे; तर निःसाधन भक्ती ही पुष्टी भक्ती आहे. पुष्टी भक्तीमध्यें भगवंत स्वतःला वाटेल त्याच्यावर वाटेल तिथे जाऊन कृपा करतो. साधन भक्तीमध्यें भक्त परतंत्र असतो व भगवंत स्वतंत्र असतो. परंतु, पुष्टी भक्तीमध्यें भगवंत परतंत्र असतो तर भक्त स्वतंत्र! भक्ताच्या प्रेमाच्या बंधनात भगवंत अडकतो!
यशोदा मातेच्या प्रेमामुळेच भगवंत दोरीनें बांधले गेले, गोपिकांच्या लोण्याच्या नवनित प्रेमामुळेच भगवंत नाचु लागले. निःसाधन भक्तीमध्यें भगवंत स्वतःच साधन बनतो! साधन भक्तीमध्ये भगवंताला काही समर्पित केल्यावर ते भक्तानें वापरणें निषेध मानलं आहे; परंतु निःसाधन भक्तीमध्यें भगवंताला यद्यद सकल समर्पित केल्यावर ते प्रसाद म्हणून वापरण्याचा विधी मानला आहे! साधन भक्तीमध्यें शोडषोपचार, नैवेद्य, धुपदिप आरती, श्लोक इ. झालं की पुजा समाप्त! पण निःसाधन भक्तीमध्यें भांडी घासणे, घर झाडणे, भाजी आणणे ही भगवद्सेवा अविश्राम अहर्निशी चालू असते! कारण,
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् ।
करोमि यद्यत्सकलं परस्मै । गुरुवरायेति समर्पयामि ॥
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


No comments:
Post a Comment