🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
*शंका*- एकाच्या कैवाडे ! उगवी बहुतांचे कोडे !! म्हणजे काय समजुन सांगा ना ....ही नम्र विनंती !
➡
श्रीराम! ताई, तुम्ही ही शंका अगोदर मला वैयक्तिक अकाऊंटवर विचारली, तेंव्हा मी तुम्हाला म्हंटलं की इथे सांगू की ग्रुपमध्ये? तर तुम्ही म्हंटलात, "ग्रुपमध्ये! कारण इतरांना देखील त्याचा अर्थ समजेल."
वरील ओवीचा हाच तर अर्थ आहे. ही शंका तुम्ही एकटीनें मांडली. परंतु, त्याचं निरसन एकांतात न करता लोकांतात केलं तर अनेकांना या ओवीचं कोडं सुटेल. हेच तत्व तुकोबांनी ओवीबद्ध करून सांगितलं की, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचें कोडे । भगवंताचा स्वभाव वर्णन करतांना तुकोबा म्हणतात की, एकाच्या समाधानासाठी चिंतनाचं निमित्त करून तो अनेकांचं कोडं सोडवतो!
आपल्याला व्यवहारातील 'गव्हासोबत किडे रगडले जातात', असा वाक्प्रचार माहीत आहे. त्याचा अर्थ एखादी वाईट व्यक्ती असेल तर तिचा नाश करतांना अनेक निरपराध लोकांना देखील शिक्षा भोगावी लागते. परमार्थात याच पातळीवरचा परंतु सुखद सिद्धांत वरील ओवीत तुकोबांनी मांडला आहे. एकाच्या कैवाडे, उगवी बहुतांचें कोडे । एखाद्या भक्ताच्या कल्याणाचं निमित्त करून भगवंत अनेक बद्धांना सिद्धावस्थेपर्यंत जाण्याचा मार्ग खुला करून देतो.
या ओवीचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे परब्रम्ह परमात्मा भगवान श्रीकृष्ण आणि शरणागत भक्त अर्जुन! अर्जुनाच्या मनांत शंका होती. ही शंका युद्ध करणे, न करणे याबद्दल नव्हती. ही शंका मोहातून निर्माण झाली होती. मोह ही शंका नव्हती. प्रिय व्यक्तींबद्दलच्या मोहातून श्रियसंदर्भात शंका होती. युद्ध करणे न करणे यांतून श्रिय म्हणजे हित, कल्याण होईल का? ही ती शंका होती. आणि ही श्रिय म्हणजे कल्याण कशात आहे शंका विचारल्यावर भगवंतानें या एकाच्या कैवाडे (एकाच्या कल्याणासाठी) जो हितोपदेश दिला, त्यातून येणाऱ्या लाखो करोडो लोकांचे म्हणजे बहुतांचे सर्व कोडे सुटले गेले! एकाच्या कैवाडे उगवें बहुतांचें कोडे ।
खरोखर, अर्जुनासारख्या एका भक्ताच्या समर्थनासाठी (एकाच्या कैवाडे) आजच्या मोहाच्या गुंत्यात गुंतलेल्या बहुतांचे कोडे उलगडण्याचं काम या भगवद्गीतेनें केलं आणि पुढेही करत राहील! आपल्याला देखील प्रेयसापेक्षा (विषयापेक्षा) श्रेयसाचा (कल्याणाचा) ध्यास असेल, तर अर्जुनासारखा पूर्ण शरणागत भाव ठेवावा!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


No comments:
Post a Comment