Wednesday, December 13, 2017

कौतुक व स्तुती यात फरक काय ?

 🌹🌷🌹*"नामप्रेमचिंतन"* 🌹🌷🌹
*शंका*- कौतुक व स्तुती यात फरक काय ?

*श्रीराम!*कौतुक हे कार्य बघून केलं जातं, तर स्तुती ही कर्ता बघून केली जाते. कौतुक हे कार्याची पोचपावती असतं, तर स्तुती ही कर्त्याला त्याच्या महानतेची आठवण करून देण्यासाठी असते....
कौतुकानें कार्यप्रवणता वाढू शकते, तर स्तुतीनें कर्तेपणाचा अभिमान वाढू शकतो!
कौतुक करतांना कौतुक करणाऱ्याला कमीपणा येत नाहीं, परंतु स्तुती करतांना स्तुतीपाठक स्वतःकडे कमीपणा घेतो!
व्यवहारांत आपला स्वार्थ साधण्यासाठी एखादी व्यक्ती स्वतःकडे (बाहेरून) कमीपणा घेऊन समोरच्याची नाहक स्तुती करते.
परमार्थात भक्त भगवंताची स्तुती करतांना स्वतःकडे (मनांतून) कमीपणा घेतो, ज्याला समर्पण किंवा शरणागतभाव म्हंटले जाते!
यांत साधकानें कोणती भुमिका ठेवावी?
समोरच्या व्यक्तीचं आवश्यक तिथें अवश्य कौतुक करावं, जेणेकरून एकीकडे समोरच्याला आणखी चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा मिळेल व दुसरीकडे स्वतःचा अहंकार शमन होईल!
याउलट, कुणी आपलं कौतुक किंवा स्तुती करत असेल तर साधकानें मी या कौतुकास पात्र नाही. माझ्याकडून जे काही चांगलं झालंय ते करवून घेणारा 'तो' आहे, हा भाव मनांत ठेवावा जेणेकरून एकीकडे आपल्यात त्या स्तुतीमुळें अहंकार येणार नाही व दुसरीकडे कुणी आपली स्तुती केली नाही तर रागही येणार नाही!
मला या ठिकाणी संत रहिमची प्रकर्षानें आठवण होतीये...
संत रहिम हा जेवढा मोठा भक्त व कवी होता, तेवढाच मोठा दानशुर देखील होता. परंतु, दान देतांना तो जसजसा हात वर करी, तसतशी नजर शरमेनें खाली झुकत असे....लोकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटे!
या शंकेचं उत्तर तुलसीदासाला माहीत होतंच, परंतु रहिमकडून वदवून घेण्यासाठी तुलसीदासानें त्याला पत्र लिहून या विचित्र वागण्याचं कारण विचारलं:
*ऐसी देनी देन जो कित सीखे हो सैन ।*
*जो जो कर ऊंचो करो त्यु त्यु निचे नैन ।।*
यांवर रहिमनें सुद्धां दोहा लिहून उत्तर दिलं:
*देनहार कोई और है भेजत जो दिन रैन ।*
*लोग भरम हम पर करे तासु निचे नैन ।।*
रहिम म्हटला, देणारा परमात्मा आहे, तोच दिवसरात्र ही सगळी लीला करत असतो. आणि लोक माझी दान करण्याबद्दल विनाकारण स्तुती करतात. म्हणून दान देतांना मला या स्तुतीची लाज वाटून शरमेनं नजर झुकतें!
तेंव्हा, स्तुतीला deal करतांना रहिम सारखा दानी भक्त डोळ्यासमोर ठेवावा!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

No comments:

Post a Comment