Monday, April 30, 2018

नाम घेणे आणि अखंड नामात राहणे यांत काय फरक आहे?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : श्रीमहाराजांनी आपल्याला अखंड नाम घेण्यास सांगितले आहे. तर हे नाम घेणे आणि नामात राहणे यांत काय फरक आहे? श्रीराम!

श्रीराम!
नाम घेणे आणि नामात राहणे यात महदंतर आहे. सद्गुरु जेंव्हा आपल्याला नाम देतात, तेंव्हा मी जप केला पाहिजे असं वाटतं, हा परमार्थ प्रवेशाचा संकल्प होतो. परंतु, ते वाटणं जेंव्हा कृतीत येऊ लागतं, तेंव्हा आपण नाम घेणे याला सुरुवात होऊन परमार्थाची पायाभरणी होते. सुरुवातीला हे नाम कोरडे असले तरी पुढे त्या वैखरी नामाच्या पायावर आवडीने, भावे हरीनाम घेसी अशी एकेक वीट लावली जाते. सदाचरण, विवेकबुद्धी, विरागी वृत्ती, निंदा-स्तुतीचा त्याग, या खांबावर नामनिष्ठेचं छत बांधलं जातं. शेवटी "नामापरते न सत्य मानावे", हा भाव दृढ होऊन अखंड नाम घेत राहणे म्हणजे सतत नामात राहणे, हा कळस बांधल्या जातो. तेंव्हा, नाम घेणे हा पाया आहे; नामात राहणे हा कळस आहे!

आपल्या सद्गुरूंच्या चरणी जाऊन आपण त्यांना मला नाम द्या असं विनवतो. तेंव्हा, आपला अधिकार असो नसो, आपण त्यांच्याकडून नाम घेतो. त्यावेळी आपले सद्गुरु सांगतात, “कर्तव्यात कसर सोडू नका, आणि कर्तव्य करतांना नामाला सोडू नका. जिथे नाम आहे, तिथे मी आहे.” जेंव्हा, महाराज नामरूपाने माझ्या घरी यावे असं वाटून आपण नामाला लागतो, तेंव्हा आपण नाम घेणे या कक्षेत येतो. कालांतराने, नामात खरंच महाराज आहेत असं आतून वाटू लागतं आणि नाम म्हणजेच महाराज ही नामनिष्ठा व गुरुनिष्ठा एकरूप होते, तेंव्हा गुरुप्रेम-नामप्रेम एकत्वाने आपण सतत नाम घेऊ लागतो. याची परिणती अशी होते की ज्या नामामुळे महाराज आपल्या घरी आले, त्या नामाची खरी चटक लागल्याने आता महाराज आपल्या घरी न थांबता आपल्याला स्वतःच्या घरी घेऊन जातात. यालाच नामात राहणे म्हणतात. असं नामात राहणे म्हणजे गोंदवल्यात राहण्यासारखं आहे. तेंव्हा, नाम घेणे हे महाराजांना आपल्या घरी बोलावण्यासारखे आहे; नामात राहणे हे महाराजांच्या घरात जाऊन राहणे आहे!

नाम हे मातेसमान आहे. त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी घेणे सगळं येतं. लौकिक आईच्या दुधाने देह पुष्ट होतो, पण नामरुपी मातेच्या प्रेमरूपी दुधाने आत्मा संतुष्ट होतो. एखादे मूल लहान असतांना आईचे बोट धरून चालते. यामध्ये मुलाने आईचे बोट धरलेले असेल तर तो ते बोट सोडून इकडेतिकडे जाण्याची, पडण्याची शक्यता असते. परंतु, आई जर मुलाचा हात धरून चालू लागली तर ती पकड मजबूत असते ज्यामुळे आई जिकडे जाईल तिकडे मुलाला जावे लागते. नामधारक सुरुवातीला नाम घेत असतो त्यावेळी तो नामाचे बोट धरून चालत असतो. यांत कधीकधी नामाचे बोट सोडून तो व्यक्ती कामाकडे जाण्याची शक्यता असते. परंतु, एकदा का त्या नामधारकाला नामात रस येऊ लागला, नामाची ताकद कळू लागली की त्याला नामाशिवाय जगणे असह्य होते. अशावेळी त्याने नामाचे बोट धरलेले नसते तर नामाने त्या व्यक्तीचा हात धरलेला असतो. हात म्हणजे कर्म. जो सतत नामात राहतो, त्याच्या प्रत्येक कर्मात नाम पर्यायाने नामीचे कर्तृत्व असते, सत्ता असते. जन्म कर्म च मे दिव्यं! हे भगवंताचे वचन जगणे म्हणजे नामात राहणे. तेंव्हा, नाम घेणे म्हणजे आपण नामाला धरणे; नामात राहणे म्हणजे नामीने आपल्याला धरणे!

काही उपासना, कुलाचार हे विशिष्ट प्रसंग, सण किंवा पर्वकाळात असतात; परंतु देवाची पूजा ही दररोज करायची असते. नामसाधक नाम मिळाल्यावर अनुग्रह घेतेवेळी सांगितलेले ऐकून रोज सकाळसंध्याकाळ १,३ किंवा १३ माळा जप करतो. अशी काही ठराविक जपसंख्या दररोज करणे म्हणजे नाम घेणे या सदरात येते. परंतु, नाममहिमा इतर साधनेहून फार वरचा आहे, हे ध्यानांत येऊन ठराविक जपसंख्येव्यतिरिक्त जास्तीत जास्त काळ नाम घेणे हे नामात राहणे, या सदरात येते. तेंव्हा, नाम घेणे ही नैमित्तिक उपासना; तर नामात राहणे ही नित्योपासना!

नाम घेणे म्हणजे आपण जप करत असतो ते आपले कल्याण व्हावे म्हणून. यात नामाने मला दुःखापासून जपावे हा भाव असतो. परंतु, नामाची खरी गोडी जाणवून नामाशिवाय चैन पडेनाशी होऊ लागले की नामाने मला जपावे, हा भाव जाऊन आपण नामाला आपल्या प्राणापलीकडे जपतो. यालाच नामात राहणे असे म्हणतात. या अवस्थेत नाम घेतल्यानंतर आपले कल्याण होईल हा भाव लोप पावून नामात असणे हेच कल्याणाचे कल्याण आहे, हा एकात्मभाव प्रगट होतो. तेंव्हा, नाम घेणे हे नामाने आपल्याला जपणे; तर नामात राहणे म्हणजे आपण नामाला जपणे!

आपल्या घरी कुणी पाहुणे आले की आपण त्यांचे स्वागत करून त्यांना यथाशक्ती पाहुणचार करतो. त्यांना काय हवं नको याची काळजी घेतो. तसे, नाम घेणे हे आपल्याकडे पाहुणे आले की त्यांच्या सेवेत तत्पर होणे आहे! परंतु, याउलट आपण कुणाच्या घरी चार दिवस रहायला गेलो की, जेवायला काय बनवायचे, घरात सामान आहे का कसलीही काळजी न करता मजेत पाहुणचाराचा आनंद घेतो. नामात राहणे हे आपण पाहुणे म्हणून रहायचे म्हणजे काय होईल याची चिंता न करता मजेत नामाचा प्रेमानंद घेणे आहे!

आतापर्यंत ज्या पद्धतीने मी नाम घेत होतो, त्यात कदाचित चिकाटी आणि नियमितता असेलही. पण त्यात सर्वाधिक आनंद मिळणे हे माझे ध्येय आहे. या ध्येयाप्रत पोचण्यासाठी मला सतत नामात रहावे लागेल. यासाठीचा प्रवास सुरु झाला आहे, ती सुरवात चागली आहे. पण त्याची परिणती भगवंतालाच माहित. आगाज अच्छा है, अंजाम खुदा जाने! तेंव्हा, नाम घेणे हा आगाज आहे; नामात राहणे हा अंजाम आहे.

मला असं वाटतं की भगवंत म्हणत असेल, “तुम्ही आज नामाला लागले आहात. ही सुरुवात आहे, परिसीमा नाही. नामाला लागणे हे कमी नाही. कारण नामाला लागणे म्हणजे हृदयात काळजी, चिंता, दुःख यांचं आता काही काम नाही. परंतु, काळजी, दुःख निवारण एवढंच नामाचं महिमान नाही. हजारो लौकिक गोष्टींच्या गराड्यात नामाचा अलौकिक महिमा न कळण्याइतकं अतर्क्य, अगम्य असं माझं नाम नाही.” भगवंताचं हेच म्हणणं खाली काव्यमय स्वरुपात आहे.
आगाज है अभी ये, अंजाम नही है |
मायुसियो का इस दिल मे कोई काम नही है |
पहचान न सके वो हजारो की भीड मे |
इतनाभी तो अजीब मेरा नाम नही है ||
तेंव्हा, यातील मर्म समजून घेऊन आपण जे नाम घेत आहोत, त्याची आंतरिक तीव्रता, प्रेम, तळमळ वाढवून आपल्या नामसाधनेचा आगाज आपण अखंड समाधानाच्या अंजाम पर्यंत नेण्याचा प्रयत्न याच जन्मी करूया, महाराज नक्की यश देतील!

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Sunday, April 29, 2018

बंधन व मुक्ती


🌸🌹🌸 ।। नामसंध्या ।। 🌸🌹🌸

श्रीराम!
भगवंताने ही सृष्टी निर्माण केलेली असल्याने याठिकाणी येणाऱ्या जीवात त्याचा अंश असतोच असतो. परंतु, अहंपणामुळे मनुष्य मी अंशीचा म्हणजे भगवंताचा अंश आहे हे विसरून अनाचार करतो. अहंपणामुळे जगतसंबंध दृढ होऊन मनुष्य बंधनात अडकत जातो. पण अहंकृतीला दंडित करून जो भगवद्संबंध दृढ करतो, तो मोक्षाकडे वाटचाल करतो.

हे जसे सामान्य मनुष्याचे आहे, तसेच मनुष्याला निर्माण करणाऱ्याला भगवंताचें आहे. अनन्यता पूर्वक समर्पण असेल तर भगवंत त्या समर्पित भावासाठी स्वतः जीवरूपाने जगतबंधनात येतो. माझं "प्रत्येक" कर्म, विचार, भाव जर भगवंताला समर्पित होत असतील, तर ते कर्म, विचार, भाव  या ना त्या रूपात भगवंत स्विकारण्यासाठी हजर असतो. आणि भगवंतांचे असे प्रागट्य म्हणजे भक्तासाठी जिवंतपणी मुक्ती! यातून बोध घेऊन आपल्या सद्गुरूंना विनवणी करावी की,
अनन्यता मज घडो स्वानंद रूपी ।।

🌹।।जानकी जीवन स्मरण जय जय राम।।🌹

Saturday, April 28, 2018

प्रल्हादबोध!!!


🌸🌹🌸  ।। नामसंध्या ।।  🌸🌹🌸

श्रीराम!
एखादा साधक जेंव्हा निष्काम कर्मयोगाच्या शिखरावर पोचतो, तेंव्हा त्याला कृतकृत्यतेचा अनुभव येतो; तो जेंव्हा आत्मज्ञानाने परिपूर्ण होतो, तेंव्हा त्याला परमशांतीचा अनुभव येतो. परंतु, तोच साधक जेंव्हा भक्तियोगाच्या जोरावर भगवंताला अनन्यपणे साद घालतो, तेंव्हा भगवंत कुठूनही त्याच्यासाठी प्रगट होतो. हाके सरिसी उडी । घालूनिया स्तंभ फोडी ॥ बाह्यांगाने जड वाटणाऱ्या खांबातील सुप्त परब्रम्ह चैतन्य प्रगट करण्याचे सामर्थ्य प्रल्हादासारख्या एका अनन्य भक्तातच असते. भगवंत सदेह प्रगट व्हायला अत्यंत उतावीळ आहे; आपली तळमळ कमी पडते याला तो काय करणार!

आजच्या नृसिंह जयंतीच्या पर्वकाळात अद्वितीय भक्त प्रल्हादाकडून आपण पाच गोष्टी आत्मसात कराव्यात. पहिली गोष्ट म्हणजे बालपणापणीच अध्यात्मप्रवेश झाला तर मन उन्मन होण्याची एक अढळ बैठक तयार होते.  दुसरी गोष्ट म्हणजे एकदा का सद्गुरूंचा उपदेश मिळाला की त्यापरते दुसरे कुणीही दैवत नाही, ही श्रद्धा जरुरी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जन्माला आल्यावर कितीही लौकिक ऐश्वर्यसुख असलं तरी त्रिविध ताप आणि घरातील ताणतणाव चुकणार नाही, हे व्यावहारिक सत्य स्वीकारलेच पाहिजे. आणि चौथी पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा कोणतीही सबब न देता निष्ठेने अखंड नामस्मरण साधता येते. या चार गोष्टी जो आत्मसात करेल, त्याला चतुर्विध मुक्तीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!

कयाधूसुत प्रल्हादाने, नाम घेतले अति आवडीने ।
उद्धरिले त्या दुष्ट पित्याला, स्मरूनी हेचि नाम ।।

🌹 ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। 🌹

Thursday, April 12, 2018

मंद मुमुक्षु आणि तिव्र मुमुक्षु यावर प्रकाश टाकावा!

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : साधक अवस्थेपुर्वी मंद मुमुक्षु आणि तिव्र मुमुक्षु अशा दोन अवस्था असतात, असे आपण बोललात. त्यावर प्रकाश टाकावा!


श्रीराम!
परमार्थ म्हणजे अखंड तेवत राहणारा नंदादिप! ज्याचा दिवा चालू आहे तो मुमुक्षु!
परंतुसुटले अफाट वारे । मन तारू त्यात बिथरे ।। असे विषयाचेविकाराचे वारे वाहू लागले की तो दिवा विझू शकतो. अखंड सावधानता हीच साधना!

भगवंतासमोर लावलेला नंदादिप हा विझू नयें म्हणून अखंड सावधानता आवश्यक आहे. हा दिवा विझू तर द्यायचाच नाहीपण त्याची ज्योत प्रखर ठेवण्याची काळजीदेखील घ्यायची. विषयभोगामुळे ज्याचा दिवा विझतोतो मुमुक्षु अवस्थेतून बद्धावस्थेत फेकला जातो. ते टाळण्यासाठी विषयविकाराची दारं खिडक्या बंद ठेवतो. परंतुहे दूरचे विषय नाहीसे केले तरी काही जवळचे दोष असतात.
त्यातला एक महत्वाचा दोष म्हणजे तेलाची कमतरता. तेल कमी झालं की दिवा विझत नाहीमात्र मंदावतो. या अवस्थेला मंद मुमुक्षु म्हणावं. स्मरणाचं तेल भरपूर असेल तर दिवा मंदावत नाहीउलट तिव्र प्रकाश देतो. हा तिव्र प्रकाश म्हणजे तिव्र मुमुक्षु! मंदावण्याचे कारण स्मरणरूपी तेलाची कमतरता एवढंच नसून वातीला लागलेली मानाचीकौतुकाचीअपेक्षांचीकाळजीची काजळी! ही काजळी वेळोवेळी काढत राहिलो आणि स्मरण आकंठ असेल तर हा तिव्र मुमुक्षु साधक पदाला पात्र ठरतो!

एखादा बद्ध हा सत्संग लाभला की मंद मुमुक्षु बनतो. हा सत्संग संतांचा असू शकतोसंतवचनाचा असू शकतोएखाद्या सद्ग्रंथाचा असू शकतोकिर्तनप्रवचन किंवा सद्विचारांचा असू शकतो. त्या सत्संगातून विषयाबद्दल अनासक्ती आणि भगवंताबद्दल भक्ती प्रगट करतो. आता हा सत्संग जर सतत घडला तर मुमुक्षा तिव्र होऊन तोच मुमुक्षु साधनेला लागून साधक बनतो. परंतुतिव्र मुमुक्षा ही अट आहे.
मला विषय हवाही बद्धावस्था;
मला भगवंत हवाही मुमुक्षावस्था;
मला भगवंत(च) हवाचही साधकावस्था;
तर "भगवंताला मीच हवा"ही सिद्धावस्था!

आपली गंमत कशी होते: आपल्याला भगवंत हवा असं वाटून वैराग्यविवेक वाटतो. पण ती अवस्था फार काळ टिकत नाही. किर्तनप्रवचन ऐकतांना तयार झालेला वैराग्याचा पुतळा घरी विषयी वातावरणात आला की दुभंगून जातो. पैसा कमी पडू लागलाघरात वादरुसवेफुगवे झाले की विवेक झोपी जातो. समाधानसमाधान असा डांगोरा पिटणारं मन निराश होऊन जातं. 
या अवस्थेत परमार्थाचा दिवा विझला नाही पण मंद झालेला असतो. हाच तो मंद मुमुक्षु! मग पुन्हा प्रवचनसद्ग्रंथ वाचनमननसत्संगात आलो की मी चुकलो ही जाणीव होऊन मंदपणा कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू होतो!
मी चुकतोय हे कळत नाहीतो बद्ध!
मी चुकतोय ही जाणीव म्हणजे मंद मुमुक्षु!
मी सुधरून पुन्हा चुकतोय ही जाणीव म्हणजे तिव्र मुमुक्षु!
आपण दिव्याचा दृष्टांत बघतोय. त्यालाच मोजक्या शब्दात डोळ्यासमोर ठेवुया.
ज्याने हा अंतरिचा दिवा लावलाच नाहीतो मनुष्य बद्ध समजावा!
ज्याने दिवा लावला तो मुमुक्षु!
जो तो अंतरिचा मालवूच देत नाही तो साधक!
जो स्वतःच अखंड तेवणारा दिप बनतोतो सिद्ध!
आपण नामालयातील मंडळी बद्धमंद मुमुक्षुतिव्र मुमुक्षु या त्रिकोणात फिरत राहतो. थोडी सदाचरणाची चिकाटी आणि नामनिष्ठा वाढवुयाआपले सद्गुरू साधक व सिद्धावस्था सांभाळून घेतील!


        ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Wednesday, April 4, 2018

नाम खर्ची पाडणे म्हणजे नेमके काय?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : आपण एका प्रवचनात म्हंटले की चित्तशुद्धीसाठी नाम खर्ची पाडू नका. हे नाम खर्ची पाडणे म्हणजे नेमके काय?

श्रीराम!
ज्या अंतःकरणात परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा असतोत्या अंतःकरणाला शुद्ध केल्याशिवाय आत्म्याला परमात्मस्वरुपाचं भान येत नाही. आणि हे भान आल्याशिवाय समाधीसुख म्हणजे सोप्या भाषेत अखंड समाधानाचा अनुभव घेता येत नाही. कर्ममार्गभक्तीमार्गज्ञानमार्ग या शाखांमधील पदवी मिळवण्यासाठी अगोदर १० वी पर्यंत सर्व विषयात उत्तिर्ण होणें जरूर आहे. आणि दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमातील विषय म्हणजे सद्विचारसद्भावनासत्क्रिया आणि सदाचरण!

नामस्मरण हा पदवी शिक्षणातील अभ्यासक्रम आहे! आपण अनुग्रहीत झाल्यानंतर जे नाम घेतोते म्हणजे पदवी शिक्षणातील प्राविण्य मिळवण्यासाठीची शिकवणी होय! जर एखाद्यानें ही शिकवणी डिग्री मिळवण्यासाठी न लावता चौथीत पास होण्यासाठी लावली तर आपल्याला त्याच्या बालिशपणाची कीव येईल! त्याचप्रमाणेंनामस्मरणाची शिकवणी 'रामदासही डिग्री मिळवण्यासाठी न लावता चित्तशुद्धी करण्यासाठी लावली तर संतमंडळींना आपल्या बालिशपणाची कीव येत असेल!
माझा एक आवडता ग्रंथ "विवेकचुडामणी" यांत आचार्यांनी एका ठिकाणी फार मार्मिक सांगितलं आहे : चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तुपलब्धये। कर्मानें चित्त शुद्ध करता येईलपरंतु त्यानें "भगवद्प्रेम" नावाची वस्तु मिळत नाहीअसं सांगतांना शंकराचार्यांनी दोन अतिशय महत्त्वाचे संकेत केले असावेत....

पहिला संकेत म्हणजे कर्म केवळ चित्तशुद्धीसाठी सहाय्यभूत ठरतील. त्यामुळेभगवद्प्रेम किंवा परमात्मज्ञान प्राप्त करण्याची बैठक तयार होईल. त्यानें अध्यात्म कक्षेत प्रवेश होईल. परंतुप्रवेश म्हणजे पदवी नाही!
चित्तशुद्धी म्हणजे मंदिरात प्रवेशतर शुद्ध चित्तात नाम भरणं म्हणजे गाभाऱ्यात प्रवेश! आपलं ध्येय गाभाऱ्यात प्रवेश हे आहे! परंतुगाभारा प्रवेश हे long term goal आहे. तत्पुर्वी मंदिरप्रवेश हे short term goal आहे! आणि मंदिर प्रवेशासाठी मंदिरापर्यंत जाण्याचं कर्म करावं लागेल. याचा अर्थकर्मानेंच मंदिरप्रवेश अर्थात चित्तशुद्धी साधेल!
वरील संस्कृत वचनातील दुसरा संकेत म्हणजे भगवद्प्रेम ही वस्तू कर्मापेक्षा उच्चकोटीच्या निराळ्या मार्गानें प्राप्त करता येते. भगवद्प्रेम ही पदवी प्राप्त करण्यासाठी आपल्याला "नामस्मरण" ही शिकवणी जरूर आहे!
नामस्मरणानेंच नामी लाभेल! जर नामानें नामी लाभत असेल तर चित्तशुद्धी होणार नाही काहोईल.
परंतुचित्तशुद्धीसाठी नाम खर्च करणे म्हणजे बाराखडी शिकण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा वेळ व उर्जा खर्च करण्यासारखं आहे! तेंव्हाचित्तशुद्धीसाठी नाम खर्च करणे हे नामाचं मोठं अवमुल्यन होईल! आणि हींच खंत श्रीमहाराजांनी देह ठेवायच्या काही दिवस अगोदर व्यक्त केली कीमाझ्याकडे येणारी माणसं नाम घेतातपण "रामप्रेम" ही वस्तू प्राप्त करण्यासाठी नाही तर कामप्रेम पुर्ततेसाठी नाम घेतात. हे तर फारच जास्त अवमुल्यन झालं!

मंदिरात जाणे हे कर्म आहेपरंतु आत गेल्यावर कर्म करायचं नसून सेवा करायची आहे. चित्तशुद्धी हे कर्म आहेतर नामस्मरण ही सेवा! ज्या कर्माला भगवद्प्रेम चिकटतं ते कर्म कर्म न राहता सेवा बनतंतर ज्या सेवेला विषयप्रेम चिकटतं ती बाह्यांगानं वाटणारी सेवा सुद्धां कर्म ठरते!
काल शिबिरात एक महिला भेटली. ती म्हंटली "माझा मुलगा फारच गुणी आहेपण नोकरीच मिळत नव्हती. त्यासाठी मी अनेक पारायणं केलीसाखरखेर्डा वारी केली ; महाराजांना आता दया आली!
आता त्याला एक एजन्सी चालवायला मिळाली आहेरोजचा चांगला गल्ला आहे! या परमार्थाला परमार्थ म्हणावा की स्वार्थ! क्षमा करापण अशी व्यक्ती मंदिरात सेवा जरी करू लागली तर मनांत विषयकामना धरूनच करेल. तेंव्हाज्याचे चित्त भोगात गुंतले आहेतो सेवा करू शकत नाही हे ध्यानांत ठेवावं! यासाठीच महाराजांनी सांगितलंभोगासंगे कुठे न गुंतावें ।। चित्तशुद्धी नसेल तर मुखांत नाम असुनही चित्तात नामप्रेम नसेल.

एखाद्या परवचा न म्हणणाऱ्या मुलालासमोर चॉकलेट ठेवून शुभं करोती म्हणण्याची बळजबरी केली तर तो शुभं करोती बाह्यांगानं म्हणेल पण त्याचे चित्त चॉकलेटकडे असेल. आपलंसुद्धां अनेकदा नाम घेताहे वैखरी । चित्त धावे विषयावरी ।। असं होतं. त्यामुळेप्रापंचिक अडचण कदाचित सुटेलपण खरं समाधान मिळणार नाही. आणि जर सर्व परिस्थितीमध्ये समाधान टिकत नसेल तर समजून घ्यावं की अजून बराच पल्ला गाठायचा आहे. कारण वरवर नाम घेत असुनही अजुनही चित्तात कामनेची घाण आहेच.
मुळात चित्त शुद्ध नाही म्हणजे त्यात विषयाची आवड आहे. विषयाच्या प्रति जो अनुराग आहेतो नाहिसा होणें म्हणजे विराग म्हणजे वैराग्य म्हणजेच चित्तशुद्धी! परंतुत्यासाठी नाम खर्च करू नयें. चित्तात जी आहारविहार इ.ची आसक्ती आहे ती विवेकानें कमी करावीं! आहार अती झाला तर आळस येईलआहार तामसिक झाला तर प्रमाद येईलविहार अती झाला की शीण येईलविहार तामसिक झाला तर तमोवृत्ती वाढेलहा आहारविहार संबंधीत विवेक! विवेकानें संयम आणणें हा नीतिधर्म आहे. तो आपल्या आचरणांत आला की शनैः शनैः चित्तशुद्धी होईल. म्हणूनच महाराजांनी म्हंटलंआचारसंयमानें युक्त असा नीतिधर्म पाळावा ।

हेंच तत्व भगवंतानें गीतेमध्ये सांगितलं कीयुक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
पणगंमत अशी होते की आपल्याला विवेक बुद्धीनें माहीत आहे पण चित्तात संयम ही वृत्ती नाही. म्हणून सदाचरण राखण्यासाठी मनांत नाम आणि हातात प्रपंचाचें काम (कर्तव्य) हे आपण सततसांभाळावं! यामुळें दुहेरी फायदा होईल: प्रपंचाच्या कर्तव्यानें चित्तशुद्धी होईल आणि मनांत नाम राहिल्यानें ते नाम मनातून खोल खोल जात राहील. मनातून खाली बुद्धीमध्येबुद्धीतून चित्तांत आणि चित्तातून अहंकाराला जाळून तो देह रामरूप होईलयांत संशय नाही!
अर्थात हे एकदम होणार नाही. किंबहुनाएकदम झालं तर तो देह राहणार नाही. ही प्रक्रिया हळूहळू झालेली उत्तम! विवेकयुक्त सदाचरणानें चित्तशुद्धी संदर्भात श्रीमहाराजांचं एक बोधवचन आपण परवा बघितलं: एखाद्याला आज १०५ ताप आहे आणि उद्या तो एकदम ९५ झालातर ते बरें नाही. तसेंचमनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तर तेही बरे नव्हें. आपल्यामध्यें हळूहळू परिवर्तन व्हावें आणि तें विवेकानें घडवून आणावें!
तेंव्हाचित्तात राग आहेपैशाचा हव्यास आहेवेगवेगळ्या प्रकारचे चोचले आहेतएखाद्याबद्दल द्वेष आहेतिथे नामप्रेम कसं प्रगट होणार? यासाठीएकीकडून नामस्मरण आणि दुसऱ्या बाजूनें सावधानता राखून नीतिमत्तेनें आचरण हे सांभाळलंतर रामराया प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कल्याणाचं करेल!

        ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Saturday, March 31, 2018

"रामदूत वायुसुत" या सवाईवर निरूपण

श्रीराम! गेल्या वर्षी सद्गुरू कृपेने साखरखेर्डा येथे झालेल्या "रामदूत वायुसुत" या सवाईवरचे निरूपण -


Sunday, March 25, 2018

श्रीराम चरित्र : सेतू चरित्र


 🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷

रामायण 

श्रीराम चरित्र सेतू चरित्र

श्रीराम!
सज्जनांचे परित्राणदुर्जनांचा विनाश व धर्माची स्थापना करण्यासाठी मला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागतोअसं भगवंतानें स्वतः म्हंटलं आहेत्रेतायुगातील सातव्या अवतारात परब्रम्ह परमात्म्यानें वरील तीन कारणांपेक्षा मानवी जीवनाचा एक अद्वितिय आदर्श आचरून दाखवण्यावर विशेष भर दिलाया पूर्णावतारी सगुण साकार परब्रम्हाला आपण म्हणतो, "श्रीराम"!
भगवंत अवतरीत होण्यापूर्वी या पृथ्वीवर दशानन रावणाची आसुरी शक्ती दहशत पसरवत होतीसाधूसंतऋषीमुनीभगवद्भक्तांना धर्माचरण करणें अशक्य बनलं होतं.परंतुअशा अनियंत्रीत परिस्थितीत सर्व आतंकी असुरांसह रावणासारख्या महापराक्रमी राक्षसाचा निःपात करण्यासाठीच भगवंतानें रामावतार घेतलाहे पूर्ण सत्य मानता येणार नाही....

रावणाला संपवणें हा भगवंताच्या मनुष्य अवताराचा हेतू नव्हताकारणरावणाला संपवण्याची क्षमता असणाऱ्या अनेक शक्ती या भूतलावर अगोदरच अस्तित्वात होत्या.अनेकदा देवासूर संग्रामात देवांना सहकार्य करून असुरांना नामोहरम करणारे अयोध्याधीश दशरथ महाराज हे चक्रवर्ती सम्राट त्यावेळी होतेमहातपस्वी जन्मानें क्षत्रिय आणि कर्मानें ब्राम्हण असणारे विश्वामित्र मुनी शास्त्रविद्येबरोबर शस्त्रविद्येत अतुलनीय होतेमहर्षीं वसिष्ठमुनींचं तपोबल संकल्प शक्तीनें रावणाला संपवू शकत होतं.वालीसारख्या पराक्रमी वानरानें रावणाला आपल्या बगलेत दाबून मरणासन्न अवस्थेत सोडलंयाच वालीनें आपल्या लहान बालकालाअंगदला खेळणं म्हणून रावणाला उलटं लटकवलं होतंहा वाली रावणाला कधीही संपवू शकत होताआपल्या परशुच्या जोरावर सहस्त्रार्जुनच्या सर्व भूजा कापून मस्तक धडावेगळं करणारं आणि पृथ्वीला २१वेळा निःक्षत्रिय करणारं भगवद्तत्व परशुराम पृथ्वीवर होतं.

तेंव्हारावणाला संपवण्याची क्षमता असलेले दशरथ महाराजविश्वामित्रवसिष्ठमुनीपरशुरामवाली असें दिग्गज असतांना देखील भगवंतानें अवतार का घेतलायाचं महत्वाचं कारण म्हणजे वरील दिग्गज मंडळी पृथ्वीवर होतीपरंतु ती एकसंध नव्हतीविश्वामित्र-वसिष्ठ बेबनावपरशुराम एकीकडेदशरथ महाराज दुसरीकडेजनक महाराज वेगळ्या दिशेलाया सर्वांना एकत्र बांधण्याचं दिव्य कार्य करणारी शक्ती म्हणजे श्रीरामतेंव्हारामाचं चरित्र म्हणजे सेतूचं चरित्र!
संपूर्ण अवतार कार्यात रामानें जोडण्याचंच काम केलं आहेवसिष्ठमुनी-विश्वामित्र यांना रामानें जोडलंजनक-दशरथ यांना रामानें जोडलंएवढंच नाही तर नर-वानर यांना जोडणारा देखील हाच पुरूषोत्तम आहेतेंव्हारामरायाच्या अवताराचा मुख्य हेतू म्हणजे विप्रधेनूसुरसंतहित लीन मनुज अवतार ।
वरील वचनाचा एक अर्थ असाही काढल्या जातो की साधूगोमातादेव आणि संताच्या हितासाठी भगवंतानें अवतार घेतलाम्हणजेच या सर्वांचं अहित करणाऱ्या रावणाचं अहित करण्यासाठी सुद्धां भगवंताचा अवतार होता. हे मत सर्वथा चुकीचं आहेरामानें रावणाच्या सुद्धां हीताचाच विचार केलाआणि हीच गोष्ट रामावताराला इतर अवतारांपेक्षा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतें!
रामानें रावणाचं हीतच पाहीलंयाचं उदाहरण अंगद शिष्टाई!
जेंव्हाश्रीराम वानरसेनेसह लंकेजवळ आलेतेंव्हा अंगद दूत बनून रावणाकडे गेला होतात्यावेळी रावणाला काय बोलू असं अंगदनें रामाला विचारल्यावर रामरायानें सांगितलं'काज हमार तासूं हित होई'! ज्यानें साधूसंतांचा छळ करून अधर्म वाढवलादशाननी विचारधारेचा प्रभाव वाढवला आणि आपल्या पत्नीचं अपहरण करून रघुकुलाच्या किर्तीला कलंक लावला अशा रावणाचंही हित जपणारा अद्वितिय आदर्श पुरूषोत्तम म्हणजे श्रीराम!

अशा रामरायाचं संपूर्ण चरित्रप्रत्येक प्रसंगाकडेप्रत्येक जीवाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि 'दुःखेषु अनुद्विग्न मनःसुखेषु विगतस्पृहः ||' ही वृत्ती ज्याला समजली आणि ज्यानें त्याच आदर्शावर चालण्याचा प्रयत्न केलात्याच्या अंतःकरणरूपी अयोध्येत रामजन्म होऊन ती व्यक्ती समाजात खऱ्या अर्थानें रामराज्य प्रस्थापित करू शकेलही अवस्था येण्यासाठी आपण सर्वांनी सतत नामांत राहून कर्तव्य करावेंरामराया सर्वांचं कोटकल्याण करेल!


("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

   !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏