Tuesday, August 21, 2018

मृत्यूचा उत्सव


🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : तुम्ही सद्गुरुजवळ मृत्यूचा उत्सव शिकू शकला नाहीत तर नदी समोर असूनही जीवनभर तुम्ही पाण्यापासून वंचित राहिलात असंच म्हणावं लागेल. मृत्यूचा उत्सव याचा अर्थ सांगाल का? 

श्रीराम! 

काही माणसं बऱ्याच वर्षांनी पंढरपूरला गेले. सकाळी गावाहून निघाल्यावर पंढरीला पोचायला रात्रीचे ९ वाजले. दिवसभराची भूक होती म्हणून अगोदर मंडळी हॉटेलमध्ये जेवायला गेली. नंतर विठ्ठल मंदिराबाहेर असलेली दुकानं पाहत राहिली, थोडीफार खरेदी करत राहिली. हे सगळं करण्यात शेजारती होऊन मंदिर बंद झालं. दुसऱ्या दिवशी ८ वाजताची बस पकडण्याअगोदर पहाटेच दर्शन करू असं ठरवलं. पण दिवसभरच्या प्रवासाने सकाळी साडे सात वाजता जाग आली. परिणामी, दर्शन न करता परत यावे लागले. 


जन्मासी येउनी पहा रे पंढरी
नाचा महाद्वारी देवापुढे || असं संतमंडळी वारंवार सांगत असुनही आपण लौकिक गोष्टींसाठी स्वार्थी लोकांपुढे नाक घासतो, परिस्थितीपुढे नाचतो. आणि शेवटी न्यायला गाडी आली की रिकाम्या हाताने परत जातो. हे टाळण्यासाठी वरील वचन आचरणात आणणे अनिवार्य आहे. 

विनोबा भावे म्हणत, ‘साधकाने देहाच्या मृत्यूपूर्वीचे मरण एकदा मरून पाहावे.तुकोबादेखील अभंगातून म्हणत की, मी माझ्या मृत्यूचा अनुपम्य सोहळा पहिला!
माणगंगेच्या काठी भलं, गांव वसलं हे गोंदवलं |
रूप अनुपम्य हे अवतरलं, चालतं बोलतं ब्रम्ह इथे आलं || 
हे परब्रम्हाचे चैतन्य अनुभवायचे असेल तर "गोंदावले वास" जरूर करावा, पण तिथे गेल्यावर "रामनामी श्वास" घ्यावा हे महत्वाचे आहे. आणि रामनामी श्वास घेण्यासाठी लौकिकाचा ध्यास सुटणे ही अट आहे. हा लौकिकाचा ध्यास सुटणे म्हणजे मृत्यूचा उत्सव शिकणे होय.

लौकिकाचा ध्यास सुटण्याची महत्वाची खुण म्हणजे मीपणामरून जाणे. माझे घर, माझी गाडी, माझी नोकरी, माझा पैसा, माझे कुटुंबीय, माझी प्रतिष्ठा या सर्व ममत्वाचा, देहबुद्धीचा कायमचा त्याग कसा करावा, हे सदगुरूंकडून शिकणे म्हणजे मृत्यूचा उत्सव शिकणे!

माझ्या मनाला आवडेल तसं घडावं, मनाला बोचेल, त्रास होईल असं घडू नये असा मनाच्या आहारी गेलेला देह अविनाशी अखंड सुखाचा अनुभव कधीच घेऊ शकत नाही. त्या अद्वितीय अनुभवासाठी आसक्त मनाला जाळणे जरूर आहे. मन माझे मरोनी गेले l मज केले अमर || ही संतांची दिव्यानुभूती आपल्यालादेखील येण्यासाठी हट्टी, दुराग्रही मन पूर्णपणे नाहीसे करणे म्हणजे आसक्तीच्या मृत्यूचा उत्सव करणे होय.

साधू, संत, योगी, मुनी यांना याचे पूर्ण ज्ञान असते की या भौतिक जगात सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे देहबुद्धीचा मृत्यु असते. मृत्यु हे समाधीसुखाचे साधन आहे. खरे पहिले असता मृत्यु हे मोक्षप्राप्तीचे पहिले पाउल आहे. मृत्यु ही एक अशी तपस्या आहे की तिला कोणताही काम, कोणतीही अप्सरा, कोणताही मोह, कोणताही विकार विचलित किंवा भंग करू शकत नाही. कारण मृत्यु ही अशी सर्वश्रेष्ठ मोहिनी आहे की जिच्या अधीन झालेला मनुष्य भगवत्चरणी लीन झाल्यामुळे त्याला स्वर्गसुखादी मोहाकडे बघावे सुध्दा वाटत नाही.

ब्रम्हज्ञानी, भगवद्भक्त किंवा अधिकारी संत या मृत्युचे महत्व ओळखून तिच्यापासून पळण्याचा प्रयत्न न करता आनंदाने तिला आपल्याजवळ बोलावत असतात. आणि याहीनंतर देहाच्या पातळीवर जगत्कार्य पूर्ण झाल्यावर महात्मे दैहिक मृत्युला आलिंगन देऊन लौकिक कार्यापासून स्वेच्छेने निवृत्त होतात.

देहबुद्धी नेणो काही, दास अंकित रामापायी | यांत समर्थांनी देहबुद्धीचे, ममत्वाचे मरण झाल्यानंतर दास्यत्व आणि शरणागती ही अवस्था अनुभवता येते, हा स्वानुभव सांगितला आहे. सद्गुरु किंवा भगवंत कृपा करतो म्हणजे काय तर आपलं सर्वकाही काढून घेतो. असं सर्वकाही समर्पित करण्याची कुणाची तयारी आहे? कुणी वस्तुत, कुणी व्यक्तीत, कुणी प्रतिष्ठेत, प्रसिद्धीत तर कुणी सिद्धीत अडकला आहे. ही सगळी आस सोडून सेवाभावाने प्रपंच करायला शिकणे म्हणजे मृत्यूचा उत्सव शिकणे!

दीन ब्रम्हानंद प्रार्थितसे भावे, मन लय व्हावे रामरूपी | यामध्ये पू. ब्रम्हानंद महाराजांनी आपल्या सद्गुरुंकडे विकारी मनाच्या मृत्युचे साकडे घातले आहे. कारण आधी मरण, मग शरण आणि शेवटी स्मरण!

ज्याला खरा साधक व्हायचे आहे त्याने एक महत्त्वाचा अध्यात्मसिद्धांत ध्यानांत घ्यावा की, जोपर्यंत देहबुद्धीचे मरण साधणार नाही, तोपर्यंत खरी शरणागती नाही; आणि खऱ्या शरणागतीशिवाय खरे नामस्मरण नाहीच!

एका जनार्दनी शरण, करी माहेराची आठवण || यामध्ये नाथांनी स्पष्टपणे आठवण म्हणजे स्मरणाप्रत जाण्याचा अटळ टप्पा सांगितला आहे. स्मरणाअगोदर शरण सोहळा; आणि शरणागतीसाठी मीपणाचा मरणसोहळा!
स्मरण = मरणोत्तर शरण
आता आपल्यासारख्या विषयप्रपंचात पुरता अडकलेल्या माणसाला जर देहबुद्धीचे मरण साधता येत नसेल तर आपण तिला बेशुध्द तरी केले पाहिजे. ही बेशुद्धी म्हणजे किमान नामाला बसण्याअगोदर काही काळाकरिता आपल्या देहाचे विचार आणि देहासंबंधीच्या व्यक्ती, वस्तूंचे विचार सोडून देणे. हे साधले नाही तर शरण जाता येणार नाही. आणि शरणागतीशिवाय घेतलेले नाम हे नामोच्चारण ठरते, नामस्मरण नाही.
वर सांगितलेली लौकिक बेशुद्धी दिवसभरातून जेवढा जास्त वेळ साधता येईल, तेवढा वेळ आपल्याला नामस्मरण साधेल.

काही साधकांनी मागे एकदोन वेळा विचारले होते की, ‘एखाद्या वेळी नामस्मरण झाल्यावर किंवा नाम घेतांना आत्यंतिक आनंदाने मन भरून येतं, कंठ सद्गदित होतो. पण असं नेहमी होत नाही, कारण काय?’
याचं कारण हेच की ज्या ज्या वेळी आपण देहबुद्धीला बेशुध्द करून नाम घेतलं त्या त्या वेळी त्या नामाला शरणागतीची जोड मिळाली. परिणामी ते खरं नामस्मरण झालं. आणि खऱ्या नामस्मरणाची फलश्रुती म्हणजे प्रेमाश्रू!

संत, सत्पुरुषांना नाम आठविता सद्गदित कंठ हा अनुभव सतत येत असतो, याचे कारण त्यांनी त्यांच्या देहबुद्धीला आपल्यासारखं तात्पुरतं बेशुध्द केलेले नसून तिचे मरण साधलेले असते. आपल्याला या अनुभवाप्रत पोचण्यासाठी अगोदर देहबुद्धीला मधूनमधून बेशुध्द करून शेवटी तिचा मरणसोहळा साधावा लागेल. मी पण माझे नेले हिरोनिया ।' अशा अवस्थेपर्यंत जाण्याची सुरुवात आपली वस्तू, व्यक्ती, पदार्थ आणि मान, लौकिकाची हौस याला सोडण्यानेच होणार. अन्यथा देहाचा मरणसोहळा होईल, पण मीपण मात्र वासनेच्यारूपाने जिवंतच राहील. याची चाड बाळगून आपण सदगुरूंकडून हा मरणोत्सव शिकण्याचा मनापासूनआचरणात्मक प्रयत्न करूया! 
मरणा भीणे भीती जीव । - बद्ध मनुष्य
आम्हा मरण्याचा उत्सव ।। - सिद्ध महात्मा
कधी मरु कधी मरु। कधी देहाते विसरू ।। - उत्कंठा लागलेला मुमुक्षु



🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Sunday, July 8, 2018

काकड आरती ब्रम्हचैतन्यनाथा ||

🌹🌿🌹 चिंतन ही तुझी सेवा 🌹🌿🌹

श्रीराम!
रामरायाच्या इच्छेने आणि श्रीमहाराजांच्या सत्तेने श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथे सद्गुरूचरणी आज घडलेली प्रवचन सेवा:

चिंतन विषय -

काकड आरती ब्रम्हचैतन्यनाथा, स्वामी चैतन्यनाथा ।
पूर्णानंदे सद्गुरुचरणी, प्रेमानंदे सद्गुरुचरणी ठेविला माथा ।। धृ ।।

सत्व, रज, तमोगुणाचा काकडा केला ।
माया, ममता, स्नेहामाजी समूळ भिजविला ।।१।।

नित्य ज्ञानानंद ज्योती लावूनिया त्याला ।
सप्रेमे आरती करू स्वयंप्रकाशाला ।। २ ।।

सबाह्य अभ्यंतरी स्वरूप पाहुनिया रंगला ।
श्रीरामी आराम जपे नाम मंगला ।। ३ ।।

🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏

Wednesday, June 20, 2018

सध्या परीक्षा सुरु आहे!



🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷

तुकामाई माझ्या गुरूंची माऊली 
अनन्यता ज्याच्या जवळी त्याला ती पावली 

श्रीराम!
भगवंत हा करुणासिंधु आहे असे आपण म्हणतो. परंतु, समुद्र हा कितीही मोठा असला तरी त्याला मर्यादा असते. समुद्रापेक्षा विशाल आणि सर्वव्यापक आकाश असते. भगवंताच्या करुणेपेक्षा व्यापक संतांची करुणा असते. ‘तुका झाला आकाशाएवढा’ अशी संतांची करुणा असते. अशा संतांचे आणि समर्थ सद्गुरूंचे आपल्यावर किती उपकार आहेत, याची आपल्याला कल्पना येणे कठीण आहे. आपल्या परंपरेचा विचार केला तर आपल्या सद्गुरुंपेक्षा त्यांच्या सद्गुरूंचे तुकामाईचे यांचा आपल्यावर एक विशेष उपकार आहे. आपल्याला तो उपकार वाटत नाही हा आपला दोष आहे. हा विशेष उपकार चिंतनाच्या शेवटपर्यंत कळून जाईल.

उपकाराच्या तीन तऱ्हा आहेत; प्रतीउपकार, परोपकार आणि उपकार!
व्यवहारी मनुष्य मला कुणी मदत केली म्हणून मीपण त्याला करायला पाहिजे असे वागतो म्हणजे प्रतीउपकार करतो; भगवंत आपण त्याला मदत केली म्हणून तो आपल्याला सांभाळतो असं नाही, पण सदाचरण राखले तर आपल्यावर तो परोपकार करतो. संत किंवा सद्गुरूंचे तसे नसते. आपल्यासारखे बद्ध विषयात बुडालेले त्यांना बघवत नाही आणि आपलं कल्याण व्हावं याच तळमळीने आपल्याला सतत निरनिराळ्या निमित्ताने सन्मार्ग दाखवत असतात. हा संतांचा निरपेक्ष, निःस्वार्थ उपकार आहे.
असे अनंत उपकार करणारे सद्गुरु लाभूनही आपण त्यांच्यावर प्रतीउपकार तर करूच शकत नाही. मात्र आपला अहं प्रबळ करून आपण त्यांच्यावर अपकार मात्र रात्रंदिवस करत असतो. माझे सद्गुरु माझ्यासाठी सर्व काही आहेत, असं म्हणणारा अनेकदा घरातील आपल्या लाडक्या व्यक्तीला जरासा ताप आला तरी त्याला उपासनेला जाववत नाही की नामाला बसवत नाही. वस्तू, व्यक्तीमध्ये आसक्त असलेला मनुष्य वाणीने जरी गुरुः साक्षात परब्रम्ह म्हणत असेल तरी सद्गुरूंच्या तुलनेत नेमकं घरच्या मंडळींना प्राधान्य देतांना दिसतो. बरं याहीपुढे जाऊन आपलं घरच्यांवरदेखील खरं प्रेम नाही असं दिसतं. घरातील मंडळींवर तथाकथित प्रेम असूनही त्यांनी काही कमीजास्त बोललं किंवा आपल्या मनाविरुद्ध वागलं तर आपल्याला ते सहन होत नाही. याचा अर्थ माझं सद्गुरुंपेक्षा माझ्या लौकिक माणसांवर आणि त्या माणसांपेक्षा माझं स्वतःवर जास्त प्रेम आहे. यालाच अहंपणा म्हणतात. आणि संतांचा उपकार याच ठिकाणी भगवंताच्या परोपकारापेक्षा श्रेष्ठ ठरतो.

कसं ते पहा: आपण कसंही वागलो तरी आपल्या घरच्या लोकांनी आपल्याशी चांगलंच वागावं ही आपली सुप्त अपेक्षा असते. आणि तसं झालं नाही तर आपला अहं दुखावतो. समोरच्या व्यक्तीचा अहं किती मजबूत आहे हे त्याची चूक नसतांना त्याचा अपमान, निंदा केल्यावर खऱ्या अर्थाने दिसून येते. तुकामाईंनी त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक लोकांचा विनाकारण अपमान, शिवीगाळ करून त्यांच्या अहंची खोली आणि व्यापकता तपासली. जे त्यात अनुत्तीर्ण झाले, त्यांचा बद्ध जीव म्हणून धिक्कार केला. परंतु, गणूसारखा एक समर्पित मुलगा या परीक्षेत उत्तीर्ण झाला तेंव्हा त्याच्यातील ब्रम्हतत्व चेतन करून त्याला “ब्रम्हचैतन्य” म्हणून गौरविले. गणुबुवा हे मुळातच परब्रम्हाचं चेतन रूप होतं. तरीसुद्धा मुमुक्षू म्हणून आलेल्याला साधक आणि शिष्य बनण्यासाठी सर्वप्रथम निरहंकारी बनणे जरूर आहे. याचा धडा तुम्हाआम्हाला देण्यासाठी तुकामाईंनी गणू कितीही मनोभावे आज्ञापालन करत असला तरी त्याच्याशी विक्षिप्त वागले.

तुम्ही आम्ही आपल्या सद्गुरुंकडे अनुग्रह घेण्यासाठी गेल्यावर सद्गुरूंनी आपल्याशी असे मानहानीकारक वागले असते तर आपण म्हटलो असतो, ‘त्यांचा अनुग्रह त्यांच्याजवळ. ज्यांना सर्व जगत भगवद्स्वरूप आहे हे न कळता दुसऱ्याचा असा अकारण अपमान करावासा वाटतो, तो कसला सद्गुरु!’

आपल्याला जर असं वाटत असेल की ‘खरंच आपल्या सद्गुरूंनी आपली अशी कोणतीही परीक्षा बघितली नाही!’ तर ते चूक आहे. आपल्यालादेखील तुकामाईच्या या परीक्षेला सामोरे जाणे अनिवार्य आहे. किंबहुना सध्या परीक्षा सुरु आहे.
तुकामाई आपल्या विक्षिप्त वागण्यातून अगोदर समोरच्या व्यक्तीचा मीपणा जाळून टाकतात आणि मग पूर्ण कृपा करतात. भगवद्प्राप्तीची खरी तळमळ असलेल्याने आपल्या घरातील, बाहेरील व्यक्तींकडून होणाऱ्या सकारण अकारण अपमान, निंदा, द्वेषयुक्त वागण्याला सहन करून आपला अहं हळूहळू नामशेष करणे अनिवार्य आहे, हा सुबोध तुकामाईंनी आपल्या विक्षिप्त वागण्यातून दिला.
अहं जाळण्याचे कार्य भगवंताच्या हातात नाही. “अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः  असं पवित्र अभिवचन देणाऱ्या भगवंताच्या मुखातदेखील अहं आहे. परंतु, सद्गुरु ‘रामराया कल्याण करील बरं बाळ!’ असं म्हणतात आणि मानतात. तेंव्हा अहंकृती, अभिमान जाळण्याचे काम फक्त सद्गुरूच करू शकतात. आणि अहंकृती जाळणे, हाच सद्गुरूंचा आपल्यावर सर्वात मोठा उपकार आहे.

आपला अहंकार दहादिशांनी पसरलेला आहे. असा दशाननी अहंकार जाळण्यासाठी आपल्याला अंतःकरणात तितिक्षा आणि मुखात भगवंताचे नाम ठेवून सदाचरण राखावे लागेल. जेंव्हा जेंव्हा आपलं काहीही चुकलं नसतांना आपल्या घरच्या मंडळींकडून, नातेवाईकाकडून, किंवा समाजातून आपल्याला नाहक त्रास दिल्या जात आहे, तेंव्हा उद्विग्न न होता तुकामाईंच्या इच्छेने श्रीमहाराज आपल्यातील अहं जाळण्याचे काम करत आहेत, हे ध्यानांत ठेवावे. असं लक्षात ठेवलं तरच मनाचा त्रागा न होता नामाला, उपासनेला बसलो की अनुसंधान टिकण्यास मदत होईल. आपल्याला मानसिक इ. क्लेश देणारी घरातील, बाहेरील मंडळी स्वतः हे करत नसून खऱ्या अनुग्रहासाठी तुकामाई त्यांच्या निमित्ताने आपली परीक्षा घेत आहेत, हा भाव दृढ करावा.
या सावधानतेने आपण व्यवहार आणि साधना चालू ठेवली तर आपले सद्गुरु आणि त्यांचे सद्गुरु दोघांचा कृपाशीर्वाद लाभून आपला शेवटचा श्वास पुण्यतिथी होईल!

नमन माझे येहळेगावी गुरू तुकामाईला 


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Monday, June 18, 2018

साक्षात्कारी अनुभव!!!

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : परमार्थातील स्वप्नं, साक्षात्कार, अनुभव हे कितपत खरे मानावे?

श्रीराम!
श्रीमहाराज म्हणत की अनुभवांच्या पाठीमागे लागू नये. साधनेतील सर्वात मोठा आणि एकमेव अनुभव म्हणजे निःस्वार्थपणे भगवंताच्या अखंड स्मरणात राहण्याची आवड निर्माण होणे. इतर सर्व अनुभव, दृष्टांत हे बऱ्याचदा साधनेला पूरक न ठरता मारक ठरत असतात.

महाराजांची क्षमा मागून आपल्या स्वप्नाचा मी व्यक्तीशः असा अर्थ लावेन की, हरिकडे मनाने पाठ करून केवळ तोंडाने हरिपाठ म्हणणाऱ्याकडे हरि पाठ फिरवतो. गीता पाठ आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु, गीता वाचून अर्जुनत्व सिद्ध होत नसून गीता आचरून सिद्ध होते, हा नियम ध्यानांत घेणे जरूर आहे.

स्वप्नांत सद्गुरूंनी दर्शन दिले किंवा एखाद्यावेळी उपासनेत भगवद्प्रेमाने डोळ्यात आनंदाश्रू आले म्हणजे आपले शिष्यत्व सिद्ध झाले असे नाही. मला महाराजांनी किती सांभाळले आहे, महाराज मिळाले यासारखा आनंद नाही, नामात राहण्यासारखे सुख नाही अशा प्रकारच्या भावोत्पत्तीमुळे डोळे खरंच भरून आले, ह्रदय खरंच सद्गदित झाले असेल तर त्या क्षणानंतर देहात प्राण असेपर्यंत ‘कसलीही’ काळजी आणि ‘कसलीही’ इच्छा उरली नाही असे होते का? जर असं होत नसेल तर आनंदाश्रू, सद्गदित कंठ हे भक्तीयुक्त भाव नसून तो केवळ आणि केवळ भ्रम आहे.

काल मंदिरात महाराजांच्या पादुका बघून, भजन म्हणतांना मी देहभान हरपलो होतो आणि आज सकाळी उठायला उशीर झाल्याने पाणी भरता आले नाही, आता पाण्याची टंचाई या कारणाने जर मी थोडाही व्यथित होत असेल तर कालचं देहभान हरपणं हे स्मृतीभ्रंशाचा परिणाम समजावा. आणि तरीही मी याला महाराजांचा दिव्यानुभव किंवा साक्षात्कार समजत असेल तर पारमार्थिक दृष्टीने हा आत्मघात ठरेल.

परमार्थाचा पहिला सोपान, अधिष्ठान म्हणजे संदेहमुक्ति; तर परमार्थाचा अंतिम सोपान, कळस म्हणजे देहमुक्ती. देहमुक्ति होण्यासाठी अगोदर संदेहमुक्ति झाली पाहिजे. संदेहमुक्तिमध्ये निर्भयता आणि समर्पणभाव येतो. आपल्याला आपल्या सद्गुरूंचा, भगवंताचा जो काही तथाकथित अनुभव, साक्षात्कार किंवा दृष्टांत झाला आहे असे आपण म्हणतो, त्यानंतर जर आपण ‘सर्वार्थाने’ निर्भय आणि समर्पित झालेलो असू तर तो खरा अनुभव, तो खरा साक्षात्कार; नसता तो केवळ आभास!

जगाला उपदेश देण्याचा मला अधिकार नाही. परंतु, मी माझ्या साधनेबद्दल विचार करतो तेंव्हा मला असे वाटते की माझा व्यवहार, माझा प्रपंच हा माझ्या परमार्थाचा आरसा आहे. मी प्रपंचात, व्यवहारात, समाजात माझ्या आचरणात काय आहे, याला मी महत्व देतो. नामाचा फार लळा लागला आहे असं म्हणणारा मी जर फेसबुकवर अनावश्यक पोस्ट्स आणि फोटो इ. टाकून लोकांच्या प्रतिक्रियांना लाचावलेलो असेल तर याला भगवद्भक्ती कसे म्हणता येईल. मला महाराजांशिवाय दुसरं काही सुचतच नाही हो, असं म्हणणारा मी आणखी एक गाडी किंवा प्लॉट कसा घेता येईल किंवा आणखी जास्त पैसा मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्या विचारात असेल तर याला अनुसंधानाचं लेबल कसं काय लावता येईल?

माझी महाराजांवर निष्ठा आहे किंवा मला नामाची गोडी लागली आहे याची प्रचिती किंवा एकमात्र अनुभव म्हणजे “विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे जन धन माता पिता ।।”
नामदेव महाराज विठ्ठलाशी भांडत; जनाबाई तर भगवंताला शिव्या देत होती: अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या; तुझं गेलं मढं, तुला बघून काळ रडं, काळतोंड्या...... जनाबाई असं बोलायची मग मीही शिव्या देणार. तू जनाबाई झाली आहेस का? गजानन महाराज धुम्रपान करत होते, मग मी केले तर काय हरकत आहे? तू गजानन महाराज झाला आहेस का? उकीरड्यावरच्या उष्ट्या पत्रावळीवरचं खरकटं खाण्याची तयारी आहे का? असेल तर मग खुशाल विडी ओढ.

पू. बाबा बेलसरेंच्या नात्यातील एक वयस्कर महिला ओंकाराचा जप करीत. तर जेवायला बसल्या की ‘ये रे मेल्या ओंक्या’ असं म्हणून मग जेवत. यामागे त्यांचा भाव हा होता की प्रत्येक कर्म भगवंताच्या अनुसंधानात घडावं. सर्वसंगपरित्याग करून आपले प्रत्येक कर्म निरपेक्षपणे भगवंताला समर्पित अशी त्यांची दिनचर्या होती. तेंव्हा, संत भगवंताला कोणत्या नावाने हाक मारतात, भगवंताशी कोणतं नातं जोडतात ते आपणही जोडण्याअगोदर आपल्यातील संतत्व सिद्ध करावं. मला अजूनही पैसा, नोकरी, तब्येत, नातेवाईक, मान यांत कमीजास्त झालं तरी उद्विग्नता येत असेल तर आपण सद्गुरूंच्या पायाशी येण्याचा अगोदर प्रयत्न करावा. ते साधल्यावर मगच सद्गुरु माझी आई आहे, मी त्यांच्या मांडीवर बसणार किंवा भगवंताला मी माझं लेकरू समजते मी त्याला माझ्या मांडीवर घेऊन लाड करणार असं म्हणण्याचं आणि तसं वागण्याचं धारिष्ट्य करावं!

आपल्याला येणारे अनुभव, साक्षात्कार किंवा दृष्टांत यांतून गीतेच्या तेराव्या अध्यायात भगवंताने सत्पुरुषाची वीस लक्षणे सांगितली आहेत, त्यापैकी एकतरी सद्गुण माझ्या वृत्तीत स्थिरावला आहे का हे बघावे. त्या वीस सद्गुणांवर दोन वर्षांपूर्वी आपल्या ग्रुपमध्ये वीस दिवस चिंतन झाले. त्याचे सार असे सांगेन की, ज्या अनुभवाने माझ्या लौकिक जीवनात सदाचरणाच्या अंगाने कायमचा सुयोग्य बदल होईल, तोच अनुभव, तोच दृष्टांत खरा. याच संदर्भात आपण सुरुवातीला बघितले की प्रपंच हा परमार्थाचा आरसा आहे. माझी पारमार्थिक वाटचाल बरोबर चालू आहे की नाही हे आपण आपल्या व्यावहारिक जीवनातील स्थिर बुद्धी आणि शांत मनावरून ध्यानांत घ्यावे. स्थिरधी आणि प्रशांत मन ही परिणती असलेला अनुभव खरा!

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Thursday, May 24, 2018

साधकत्वातील अडचणी

🌹🌷  ।। नामसंध्या ।। 🌹🌷



श्रीराम! 
माझी एवढी अडचण दूर झाली की मी नाम घ्यायला मोकळा. एकदा मुलं व्यवस्थित शिक्षणाला, नोकरीला लागले की मी आणि माझा देव, बस्स! आमच्या ऑफिसमध्ये सध्या कामाचा फार ताण आहे, माझ्या घरी सध्या औषधपाणी, दवाखाना याच्यातच सगळा दिवस जातोय. महिना, पंधरा दिवसानंतर मला चांगलाच रिकामा वेळ मिळणार आहे. नंतर मी जास्तीत जास्त नामस्मरण करत बसणार. मुलीच्या लग्नाची फार काळजी लागली आहे. तिला चांगलं स्थळ मिळालं की आपली जबाबदारी संपली. आणि आपण प्रपंचाकडे दुर्लक्ष केलेलं महाराजांना तरी आवडेल का? त्यामुळे सगळी कर्तव्य पूर्ण केली मी आणि माझी माळ! अहो, सध्या पाठीच्या दुखण्यानं फार हैराण झालो आहे. डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरु आहे. त्यामुळे माळ घेऊन जरावेळ बसलो तरी उसण भरते. एकदा का या दुखण्यातून बरा झालो की दररोज १३,००० जप करायचं पक्कं केलंय. मला माझ्यासाठी कश्शाची अपेक्षा नाही. देवाच्या दयेनं सगळं छान आहे. एवढं या मुलाचं लग्न करून देऊन त्याला सगळं सोपवलं की आम्ही दोघांनी गुरूगृही सेवा द्यायचं ठरवलं आहे......... अपेक्षित नामस्मरण न होण्याची ही आणि अशी कितीतरी कारणं आपण कधी जड अंतःकरणाने तर कधी सहजपणे सांगत असतो.

ही कारणं जर खरी मानली तर याचा अर्थ ज्यांचं जास्तीत जास्त नामस्मरण आहे, त्यांना कसलीही प्रापंचिक काळजी, त्रास नाही. परंतु, प्रपंच आहे आणि प्रापंचिक अडचणी नाही असं संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही. प्रत्यक्ष रामराया, श्रीकृष्ण यांच्या प्रपंचातसुद्धां उणीवा किंवा अडचणी होत्या. संत, सत्पुरुष यांना प्रापंचिक दुःख, दारिद्र्य काही कमी नव्हते. मग आजच्या सांसारिक लोकांना अडचणी आहेत, यात नवल ते काय? या अडचणी असूनही एकाला नामस्मरण साधतं आणि दुसऱ्याला नाही, असं का? यासंदर्भात ज्याचे त्याने आत्मचिंतन करून स्वतःमध्ये योग्य ते परिवर्तन घडवून आणणे साधकत्वाला जिवंत ठेवण्यासाठी जरूर आहे.

“नामापरते न सत्य मानावे” असं महाराजांचं वाक्य किंवा “नाम स्मरे निरंतर, ते जाणावे पुण्यशरीर” असं समर्थवचन आपण सिनेमाचा डायलॉग म्हणावा तसं अनेकदा म्हणत असतो. परंतु, नामाचे ‘सत्यत्व’ आणि ‘सातत्य’ हे वाणीपेक्षा मनाला चिकटून ते आचरणात आल्याशिवाय खरा परमार्थ नाही, नाही, नाही!

श्रीमहाराजांची दोनच बोधवचनं आपला प्रपंच आणि परमार्थ कल्पनेपेक्षा सुखाचा करण्यासाठी पुरेशी आहेत. त्यातलं एक नकारात्मक आहे. त्यात श्रीमहाराज म्हणतात, ‘एवढी अडचण दूर झाली की मग भगवंताची उपासना करीन’, असे जो म्हणेल त्याला कायमचेच थांबावे लागेल! 
तर दुसरं सकारात्मक बोधवचन आहे. त्यात श्रीमहाराज म्हणतात, "संसारातील खटपट संपल्यावर रोज जे ३-४ तास मिळतात तो वेळ नामांत नको का जायला? खरोखर दिवसभरात जो रिकामा वेळ मिळतो तो नामासाठी दिलात तर नामाच्या राशी पडतील!"
या दोन्ही वचनांचं मर्म ज्याच्या हृदयाला भिडलं तो खरा साधक!

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Wednesday, May 23, 2018

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही!

🌹🌷  ।। नामसंध्या ।। 🌹🌷



श्रीराम! 
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात त्याप्रमाणे आपण त्या अवस्थेत गेल्याशिवाय तो अनुभव येत नाही. परमार्थात आपण ‘अखंड समाधान’ यासंबंधी अखंड वाचन, श्रवण करत राहिलो तरी सच्चिदानंदाचे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी ‘मीपणा’ मेला पाहिजे. आणि आपली सर्व साधना ही केवळ त्या ‘मी’पणाला मारण्यासाठी आहे.
पण आपली गंमत कशी होते की, अनेकदा ‘मी’पणा नाहीसा होण्यासाठी अध्यात्मग्रंथ श्रवण, वाचन, भजन, पूजन अशा ज्या साधनमार्गांचा आपण अवलंब करतो, त्यातच आपण सूक्ष्मपणे ‘मी’पणाला खतपाणी घालत असतो. ‘मी’ अमुक एक साधन करतो, या आंतरिक सूक्ष्म अहंकाराला जागं ठेवून जर आपण साधन करू लागलो तर त्यातून अखंड समाधान न मिळता विकारांना अखंड आयुष्य मिळण्याची पायाभरणी होत असते. आणि आपण बाह्यांगाने साधनेत आहोत असं आपल्याला आणि जगाला दिसत असल्याने आत खरं काय सुरु आहे, याकडे आपले मुळीच लक्ष जात नाही.
तेंव्हा, साधकाने अगोदर प्रपंचात नेटकेपणा साधण्यासाठी “मीपण जाळोनिया जगी वागा” हा सुबोध अंगीकृत करावा आणि हे करत असतांना परमार्थसंपन्नता साधण्यासाठी “नित्य नामगायनी जागा” हा सुबोध अंतःकरणात रुजवावा. यातूनच ‘अभिमान शत्रू मोठा’ मारल्या जाऊन “मानावा राम सर्वदा कर्ता” हा भाव दृढ होईल. रामरूप होण्याची हीच सूक्ष्म गुरुकिल्ली आहे!


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Monday, May 21, 2018

शरणागत भाव!!!

🌹🌷  ।। नामसंध्या ।। 🌹🌷





श्रीराम! 

‘अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः !’ किती भरवशाचं वचन आहे हे! समोरच्या व्यक्तीची लहानात लहान चूक आपण सहन करत नाही. आणि याठिकाणी परमात्मा म्हणतो की, “तुझ्या सर्व पापांचा मी समूळ नाश करीन, काळजी करू नकोस!”
असं आश्वासक विधान परमात्मा सद्गुरुरूपाने उभा राहून अर्जुनरुपी सत्शिष्यासाठी करत आहे, हे ध्यानांत घेतले पाहिजे. अर्जुन आसक्त झालेला होता, हताश होता, पण एका गोष्टीमुळे सद्गुरूंनी त्याच्या पापक्षालनाची जबाबदारी घेतली. ती एक गोष्ट म्हणजे शरणागती! नातेवाईक, तथाकथित स्वजन यांच्यात आसक्त असलेल्यावर भगवंत कृपा करत नाही. परंतु, अर्जुन जेंव्हा केशवाला सद्गुरु मानून आसक्तीसहित शरण गेला, हात जोडले, अहंकाररहित मस्तक टेकवले, तिथेच त्याचे काम झाले.
आपणसुद्धां आपल्या सद्गुरुंसमोर हात जोडतो, मस्तक टेकवतो. पण त्या हातातला कर्तृत्वाभिमान आणि मस्तकातला अतिशय सूक्ष्म ‘मीपणा’ आपल्यापासून जराही विभक्त करत नाही. परिणामी शरणागती रहित केलेला नमस्कार भक्ती प्रगट करत नाही. आणि म्हणूनच सद्गुरु आपली काळजी स्वतःकडे घेत नाही.
साधक भावे नमस्कार घाली । त्याची चिंता साधुस लागली ।। याचं मर्म समजून घेऊन तो आवश्यक भाव आपल्यात आणण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. त्यासाठी समाजात आपल्याला भाव मिळावा, ही आस सोडणे, ही महत्वाची अट आहे. परमार्थाच्या वाटेवर लौकिकाची हौस असलेला खड्डा लागतो, जो त्यात अडकणार नाही, तोच पुढे जाईल! सोपं नसेल कदाचित, पण चिंतामुक्त समाधान अनुभवण्यासाठी एवढी सावधानता बाळगायला नको का?

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Thursday, May 10, 2018

संत मुक्ताबाई चिंतन

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : आज संत मुक्ताबाई यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने थोडे चिंतन मांडावे!

श्रीराम!
जन्माला येतांनाच जीवन्मुक्त असलेल्या अधिकारी भगवद्भक्त मुक्ताईची आज पुण्यतिथी. मुक्ताबाईच्या समग्र चरित्रातील दोन उच्चकोटीचे प्रसंग आहेत. या दोन्ही प्रसंगात मुक्ताईने भागवत संप्रदायातील दोन अत्यंत महानतम संतसत्पुरुषांना दिग्दर्शन केले आहे. त्यातील एक संत म्हणजे ज्ञानियांचा राजा असलेले ज्ञानेश्वर महाराज; तर दुसरे संत म्हणजे ज्यांच्या हाताने प्रत्यक्ष भगवंत जेवतो असे पंढरीरायाचे प्रेमभांडारी असलेले नामदेव महाराज! नामदेव महाराजांना केलेले उद्बोधन नंतर कधी बघूया. आज ज्ञानोबा-मुक्ताई हितगुज!

एखादा कीर्तनकार किंवा प्रवचनकार जेंव्हा अध्यात्मिक प्रबोधन करतो, तेंव्हा ते प्रबोधन, ते अध्यात्म चिंतन श्रोत्यांच्या मनाला भिडणारे आहे की नाही, याचा विचार त्या प्रबोधनकाराने करणे जरूर आहे. परंतु, ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण अध्यात्मिक उद्बोधन केल्यानंतर आणखी एक आढावा घेतात, जो आजच्या प्रत्येक पारमार्थिक वक्त्याने घ्यायला हवा. तो आढावा म्हणजे जे चिंतन मांडले आहे, ते श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या मनाला केवळ तेवढ्यापुरतेच भिडले आहे की त्यातून त्यांचे आचरण किंवा एकूणच साधन यांत सुयोग्य बदल होत आहे का?

ज्ञानोबांनी हा आढावा घेतल्यानंतर जेंव्हा त्यांच्या लक्षात आले की लोक अध्यात्म ऐकत नाही आणि ऐकले तरी त्यातून अपेक्षित मनोमंथन घडत नाहीये, तेंव्हा त्यातून आलेल्या उद्विग्नतेची परिणती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःला कोंडून घेतले. अशावेळी ज्ञानेश्वर महाराजांना शांत करण्याचे, त्यांना पुन्हा जगत्कार्य करण्यासाठी प्रेरित करण्याचे अद्भुत कार्य ज्यांनी केले त्या संत मुक्ताबाई!

ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासारख्या कोट्यानुकोटी बद्धांना माऊली बनून समजावून सांगितले, त्या ज्ञानीयांच्या राजाला समजावून सांगणाऱ्या मुक्ताईचा अधिकार काय असेल, याचा सूक्ष्म विचार करायला हवा.

ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये क्रोध, उद्वेग, अशांती यांना जिंकण्यासाठी अत्युच्च कोटीचे उद्बोधन केले, त्या ज्ञानोबांना जेंव्हा समाजाची अधोगती बघून जी बाह्यांगाने उद्विग्नता आली, तिला शांत करण्याचा अधिकार त्रिभुवनात केवळ आणि केवळ मुक्ताबाईचाच! प्रत्यक्ष निवृत्तीनाथ महाराज सद्गुरुरूपाने त्याठिकाणी उपस्थित असूनही लौकिक वय लहान असणाऱ्या मुक्ताबाई जेंव्हा ज्ञानेश्वर महाराजांना समजावतात, तेंव्हा मुक्ताई कोणत्या पदावर असतील, हे समजले पाहिजे. मुक्ताबाईचे इतर अभंग आणि ताटीचे अभंग यातील भाषाशैलीत आणि अध्यात्मिक अधिष्ठानात फार अंतर आहे. इतर अभंगात भक्त म्हणून बोलणारी बाळबोध मुक्ताबाई ताटीच्या अभंगात एक अधिकारी मार्गदर्शक वाटते.

मानसशास्त्र शिकत असतांना एक गोष्ट अभ्यासात आली होती की स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत मानसिकदृष्टीने श्रेष्ठ आहे. मानसशास्त्र असं सांगतं की स्त्रीच्या शारीरिक वयात पाच मिळवले की तिचे मानसिक, भावनिक वय मिळते. ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा मुक्ताबाई देहदृष्ट्या ४ वर्षांनी लहान असली तरी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या ती ज्ञानोबांपेक्षा एक वर्षाने मोठी आहे. या भावबलाच्या आधारावर तिने आदेशात्मक सूचना केली की, “ताटी उघडा ज्ञानेश्वरा!” कदाचित आपल्याला देहरुपाने मुक्ताबाईसारखी बहिण नसेल; पण आपल्या संपर्कात आईच्या रूपाने, बहिणीच्या रूपाने किंवा पत्नीच्या रूपाने मुक्ताबाई आपल्याला दिग्दर्शन, मार्गदर्शन करत असते.

ताटी म्हणजे दरवाजा. त्याला कवाड असा देखील शब्द आहे. परंतु, कवाड दोन पटांचे असते; तर ताटी एक पटाची. आपण दोन पटांमध्ये म्हणजे द्वैतात कोंडलेलो आहोत, तर संत हे अद्वैतात स्थिर असतात. तुम्हा आम्हा आड द्वैताचे कवाड । हे ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्यासारख्या द्वैतात अडकलेल्या बद्धांना संबोधून म्हटले आहे; तर ताटी उघडा हे मुक्ताबाईने अद्वैताचा अनुभव पुरेपूर भरून उरलेल्या ज्ञानराजासारख्या सिद्ध सत्पुरुषाला संबोधून म्हटले आहे. 

यांत एक अतिशय सूक्ष्म गोष्ट ध्यानांत घ्यावी की ताटी उघडणे मुक्ताईला शक्य होते, पण तिने आपल्या भावाला ती उघडायला सांगितले. यांत एका अंगाने बहिण म्हणून मर्यादा आहे; तर अध्यात्माच्या अंगाने विचार केला तर ताटी ज्याने लावली त्यानेच ती उघडली पाहिजे. कर्म हे बंधन आणि मुक्तीला कारण ठरते. ज्या कर्मामुळे आपण बंधनात आलो त्याच कर्माच्या आधाराने आपण मुक्त होऊ शकतो, असा सखोल बोध मुक्ताई देत आहे. आपला दरवाजा आपणच उघडायचा असतो. दुसऱ्याने ताटी उघडणे ही जबरदस्ती होऊ शकते. परमार्थात भगवंत, सद्गुरु, सद्ग्रंथ सर्वकाही मिळाले तरी स्वतः साधन केल्याशिवाय मुक्ति नाही, हे मर्म यांतून घेतले पाहिजे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांना कार्यप्रवण करण्यासाठी मुक्ताबाईने मांडलेले चिंतन म्हणजे ताटीचे अभंग! मुक्ताबाईच्या एकेका शब्दात जबरदस्त सामर्थ्य आहे.
योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ।
विश्वरागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ।
शब्द शस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ।
विश्वपट ब्रम्ह दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।

तेंव्हा, मुक्ताबाईचे दिग्दर्शन लाभून आपण याच जन्मी मुक्त व्हावे वाटत असेल तर अगोदर तिने ज्यांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल. म्हणजेच सद्गुरु माझे कल्याणकर्ते आहेत, ही जाणीव ठेवून ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आणि नाम हाच देव आहे, या निष्ठेने नामात राहून नामदेव महाराजांची कृपा संपादन केली तरच मुक्ताबाई आपल्याला सच्चिदानंद स्वरुपाची ताटी उघडण्यासाठी प्रेरणा बनतील!


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏