श्रीराम! ५ मे २०१५ रोजी 'नारद जयंती' ला सद्गुरू कृपेने "नामालय" हा नामस्मरण उपक्रम सुरु झाला. देश विदेशातले अनेक नामसाधक या उपक्रमात सहभागी झाले. याच उपक्रमातून काही पारमार्थिक शंका समाधान "नामप्रेम" या whatsapp ग्रुपद्वारे झाले. ते पुस्तक रूपानेही आकारास आले (Contact 9881400280) इथे या माध्यमातून ते एकत्र करण्यात येत आहे. याबरोबर जी काही चिंतन सेवा गेल्या काही वर्षात झाली आहे, त्याचे एकत्रीकरणही या माध्यमातून केले आहे. यातून नामसाधन वाढीस लागून सर्वांना समाधान मिळावे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना!
Wednesday, February 28, 2018
नाम आत गेले पाहिजे म्हणजे नेमके काय? नाम उपाधिरहित आहे म्हणजे काय?
Monday, February 19, 2018
अंतःकरणाच्या चार सूक्ष्म अंगातील फरक सांगाल का?
शंका- दादा, अंतःकरणाच्या चार सूक्ष्म अंगातील फरक सांगाल का?
➡
🌿 स्थूल- सुक्ष्म करण : परमार्थ 🌿
श्रीराम! सर्वांत मोठी साधना अखंड सावधानता ही आहे. साधकानें ही सावधानता चार अंगांनी बाळगणें अपेक्षित आहे! ते चार अंग म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार....
अध्यात्मदृष्ट्या विचार करता साधना दोन प्रकारच्या असू शकतात. एक करणसापेक्ष आणि करणनिरपेक्ष. मला असं वाटतं भगवद्प्राप्तीसाठी भक्ती ही करणसापेक्ष साधना आहे, ज्यामध्ये स्थूल व सुक्ष्म दोन्ही करणांची जरूरी असतें. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चारही अंग सुक्ष्म करण आहेत. परंतु, त्यातल्या त्यात मनापेक्षा बुद्धी सुक्ष्म, बुद्धीपेक्षा चित्त सुक्ष्म, चित्तापेक्षा अहंकार सुक्ष्म आहे. या चार सुक्ष्म करणांचा संबंध चार स्थूल करणांशी येतो!
मन या सुक्ष्म करणाचा संबंध वाणी या स्थूल करणाशी आहे!एखाद्याचं मन कसं आहे, हे त्याच्या बोलण्यातून व्यक्त होतं. अंतरिचे धावें स्वभावे बाहेरी ।
तेंव्हा, वाणीची सावधानता ही साधना साधण्यासाठी मनाला अगोदर सावध करावं. समर्थांनी मनाचे श्लोक मनाला सतत सावधान करण्यासाठीच रचले आहेत!
बुद्धी, चित्त आणि अहंकार या सुक्ष्म करणांना सावधान करून ५०% परमार्थ साधल्या जातो. परंतु, मन या सुक्ष्म करणाला सावधान ठेवलं की तो पुढील तीन सुक्ष्म करणांइतका म्हणजे ५०% परमार्थ एकटाच साधतो. हेच सूत्र श्रीमहाराजांनी सोपं करून सांगितलं की, "ज्यानें जीभ जिंकली त्यानें अर्धा परमार्थ जिंकला!" जीभ हे स्थूल करण मन या सुक्ष्म करणांचं व्यक्त स्वरूप आहे!
समर्थांनी दासबोधात शिष्यत्वाची लक्षणं सांगतांना
शिष्य असावा परमशुद्ध ।
शिष्य असावा परमसावध ।। असं म्हंटलं आहे.
या परमशुद्धीसाठी परमसावधानता जरूर आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सुक्ष्म करण आहेत. यांना परमशुद्ध करण्यासाठी चार स्थूल करण परमसावध ठेवावें. या चार सुक्ष्म करणांपैकी मन या सुक्ष्म करणाला शुद्ध करण्यासाठी वाणी या स्थूल करणाला परमसावध ठेवावें, यांवर आपलं आणखी विस्तृत चिंतन याअगोदर इतर चिंतनातून झालं आहे!
मनापेक्षा सुक्ष्म करण म्हणजे बुद्धी! आपले मन सतत काही ना काही संकल्प करत असते. या बऱ्यावाईट संकल्पांपैकी सत्संकल्प सिद्धीला जावे असं वाटत असेल तर आपली बुद्धी भगवंताच्या पायी समर्पित करावी!
मनाचें संकल्प पाववेल सिद्धी ।
जरी राहे बुद्धी त्याचे पायी ।।
बुद्धी त्याच्या पायी राहणें म्हणजे त्याच्या बुद्धीनें वागायचं. संतांची बुद्धी ही परमात्म्याचा अंश असलेल्या आत्म्यापासून प्रेरित झालेली असते. त्यामुळे त्या बुद्धीला आत्मबुद्धी असं म्हणतात. याउलट आपली बुद्धी ही देहाला सुख देण्याकरताच वापरतो, त्यामुळे त्या बुद्धीला देहबुद्धी असं म्हणतात. जेंव्हा देहबुद्धी ही आत्मबुद्धी होऊन त्या आत्मबुद्धीनुसार मन देहाला विशिष्ट क्रिया करण्याचे आदेश देतं तेंव्हा ते प्रत्येक कर्म आत्मा ते परमात्मा प्रवासातील एक महत्त्वाचं पाऊल ठरतं!
या प्रवासासाठी म्हणजेच देहबुद्धीला आत्मबुद्धी करण्यासाठी ज्याची आत्मबुद्धी मुळातच प्रगट आहे अशाची संगत धरावी.
देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ।।
ही संगती लाभणें म्हणजे संताचे ऐकणें! तेंव्हा, बुद्धी हे सुक्ष्म करण परमशुद्ध करण्यासाठी कान या स्थूल करणाला परमसावध ठेवणें आवश्यक आहे.
निश्चयात्मक बुद्धी तयार होण्यासाठी म्हणजे बुद्धीशुद्धीसाठी सावधश्रवण!
बुद्धी तर्क करते. ज्ञान कानांतून मनांत जातं आणि त्यातून बुद्धी तयार होते.
ऐकू येणें आपल्या हातांत नसेल कदाचित, पण ऐकणें आपल्या हातांत आहे.
श्रोत्र यांत्रिक आहे, पण श्रोतव्य सात्विक असावें. त्यातूनच सात्विक बुद्धी तयार होईल आणि सत्वबुद्धीनें सदाचरण घडेल.
दुर्योधनाने आपले कान शकुनीला देऊन अपशकुन करून घेतला आणि त्यातून त्याची बुद्धी फिरली. प्रत्यक्ष रामरायाच्या सहवासात असुनही कैकयीनें आपले कान मंथरेला दिले आणि त्यातून तिची बुद्धी फिरली.
आपण कुणाचे ऐकतो यांवर आपली बुद्धी सद्बुद्धी होणार की दुर्बुद्धी हे अवलंबून असते. ज्याचे कान विषयच ऐकतात, त्याची बुद्धी भगवंतापासून दूर जाऊन दुर्बुद्धी बनते. आणि दुर्बुद्धी म्हणजे आत्मघात!
आपण आपल्या घरात, समाजात कान भरणारे अनेक लोक बघतो. त्यातून बुद्धीभेद होऊन प्रपंच बिघडत जातो. त्या प्रपंचाची घडी बसवण्यासाठी काही कान धरणारे आवश्यक असतात. परंतु, प्रपंचाबरोबर परमार्थाची घडी सुव्यवस्थित बसवण्यासाठी कानमंत्र देणारे फार दुर्मिळ आहेत, ज्यांना आपण "संत किंवा समर्थ सद्गुरू" म्हणतो!
शिव भगवान रामकथा सांगत असतांना सतीने त्यांना कान दिले नाही. त्यामुळे तिच्या बुद्धीभेद होऊन तिनें रामाच्या परब्रम्ह तत्वावर संशय घेऊन आत्मघात ओढवला. परंतु, पुढील जन्मात पार्वती म्हणून आल्यावर शंकरानें तिला पुन्हा रामकथा सांगितली. त्यावेळी, शिव म्हंटले, ज्या कानांनी रामचरित्र श्रवण केलं नाही ते कान सापाच्या बिळासारखे आहे, त्यामुळे आपल्या बुद्धीला विष(य)स्पर्श होऊन मनुष्य स्वतःचा नाश करवून घेतो.
तेंव्हा, बुद्धी या सुक्ष्म करणच्या परमशुद्धीसाठी कान या स्थूल करणाला परमसावध ठेवावें, परमअर्थ म्हणजे परमार्थ साधला जाईल!
तिसरे सुक्ष्म करण म्हणजे चित्त!
आपले चित्त हे मन आणि बुद्धीपेक्षा सुक्ष्म करण आहे. या चित्तांत कितीतरी जन्मांच्या वासनावृत्तींचा ढीग जमा झालेला आहे. दूषित चित्त साधनेला बाधक आहे. तेंव्हा, या चित्ताला परमशुद्ध केल्याशिवाय परमार्थ साधणार नाही. चित्त या सुक्ष्म करणाला परमशुद्ध करण्यासाठी ज्या स्थूल करणाला परमसावध ठेवायचं आहे ते म्हणजे डोळे!
चित्त आणि चक्षू यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. या डोळ्यांनी आपण कितीतरी नको त्या गोष्टी पाहतो. हे पाहणे सावधानतेनें झालं नाही तर चित्तरूपी कॉम्प्युटरमध्ये सतत विषयाचा व्हायरस वाढत जातो आणि संपूर्ण सिस्टीम निकामी करून टाकतो.
कानानें ऐकू येणें आणि ऐकणें यांत फरक आहे, तसें डोळ्याने दिसणें आणि पाहणें यात फरक आहे. दिवसभर नकळत आपल्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी येतात. आपण त्यांना दृष्टी दिली नाही तर त्या गोष्टी आपल्या चित्तांत ठसत नाही.
बसमधून जातांना आपल्याला अनेक झाडं, डोंगर इ. दिसतात मात्र आपण त्यांच्याकडे उदासीनतेने, passively पाहतो. त्यामुळे, एखादं हिरवंगार शेत असो किंवा खडकाळ जमीन आपल्या चित्तावर फारसा प्रभाव पडत नाही. परंतु, आपलं शेत जवळ आलं की चक्षूच्या माध्यमातून आपलं चित्त त्याकडे लागतं आणि मग आपल्या शेतातलं एखादं दूरचं झाड वाळून गेलेलं देखील स्पष्ट दिसतं. ते पाहून चित्तांत सुख-दुःख, लाभहानी इ वृत्ती उचंबळतात आणि तिथें समाधान कोलमडून जातं!
आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी चक्षूंनी सावधपणें जे परमशुद्ध आहे त्याकडे पहावं. परमशुद्ध केवळ परमात्माच आहे. तेंव्हा, चक्षूंनी चैतन्यब्रम्ह पाहणे यांतच चित्ताचं खरं सुख आहे.
डोळे तुम्ही घ्या रे सुख ।
पहा विठोबाचे मुख ।।
साधकाचें नयन सद्गुरूंचे चरण बघू लागले की दुश्चित्त सावचित्त होतें. सद्गुरूंचे चरण बघणें म्हणजे त्यांचे चरण ज्या मार्गानें गेले त्या मार्गाकडे जाणें. यालाच सत्संगती म्हणतात.
परवा, एका साधकानें सांगितले की, मानसपुजेत मला महाराज दिसत नाहीत. मी त्यांना म्हंटलं चित्तांत अगोदरपासून साठलेली घाण काढावी लागेल. ती काढण्यासाठी डोळ्यांनी सतत सावधान रहायला हवं. डोळे बंद केल्यावर मानसपुजेत महाराज दिसावें असं वाटत असेल तर उघड्या डोळ्यांनी सात्विकता बघावी! बापाला जो जड खांब दिसला, तोच खांब त्याच्या मुलाला सच्चिदानंद परमात्म्याचे चेतन निवासस्थान दिसला! याचं कारण त्या मुलाच्या चित्तांतच विशुद्ध परमात्मा होता!
आपण चक्षूंनी काम बघत राहिलो तर आपल्या चित्तात राम कसा येईल? आणि चित्तांतच राम नसेल तर चक्षूंसमोर खांब नाही राममंदिरातील गाभाऱ्यात जाऊनही राम दिसणार नाही.
रामासमोर उभे राहिल्यावर, भजनाला बसल्यावर ज्याच्या डोळ्यांत दोन थेंब येतात, त्याचें चित्त शुद्ध झाले आहे, यात संशय नाही. एखाद्याचे चित्त परमशुद्ध आहे की नाही हे त्याच्या डोळ्यांत दिसतं! चित्तांत वासनाविकार असेल तर त्याची दृष्टीसुद्धां विकारीच राहणार!
संत, सद्गुरूंचे डोळे बघितले तर आपल्याला त्यात विषयी लोकांबद्दल करूणा आणि भगवंताबद्दल प्रेम दिसतें. आपलं चित्त परमशुद्ध करण्यासाठी आपण आपली दृष्टी सतत गुरूनयन, गुरूवचन आणि गुरूचरण याकडेच ठेवावीं!
तीन सुक्ष्म व स्थूल करण आपण आतापर्यंत पाहिले.
मन या सुक्ष्म करणाला परमशुद्ध करण्यासाठी वाणी या स्थूल करणाला परमसावध ठेवावें!
बुद्धी या सुक्ष्म करणाला परमशुद्ध करण्यासाठी कान या स्थूल करणाला परमसावध ठेवावें!
चित्त या सुक्ष्म करणाला परमशुद्ध करण्यासाठी चक्षू या स्थूल करणाला परमसावध ठेवावें!
आणि चौथं सुक्ष्म करण म्हणजे अहंकार!
अहंकार या सुक्ष्म करणाला परमशुद्ध करण्यासाठी मस्तक या स्थूल करणाला परमसावध ठेवावें!
अहंकार या सुक्ष्म करणाबद्दल काय सांगावं? आपल्या सर्वांच्या अतिशय जवळचा मित्र आहे तो. त्याला आपण फार जपतो, वाढवतो आणि त्याला कुणी धक्का जरी लावला तरी सर्व शक्तीनिशी आपण समोरच्यावर प्रहार करतो!
हा अहंकार आपल्या डोक्यात असतो. त्याला डिवचलं की डोकं गरम होतं आणि त्या क्रोधानें चित्तांत घर केले की बुद्धी फिरून मनमानी स्वैराचार होतो. हा स्वैराचार म्हणजेच स्वनाश!
अहंकार डोक्यात असल्याने ज्याचा अहंकार मजबुत आहे असा मनुष्य आपलं डोकं सहजासहजी झुकवत नाही. भगवंताचे आतापर्यंत जे जे अवतार झालें ते या अहंकाराला संपवण्यासाठीच! रावणासारख्या बुद्धीमान, शक्तीसंपन्न शिवभक्ताचा अहंकार संपवण्यासाठी रामरायानें त्याचे मस्तक उडवलें.
एखादा साधक साधनेच्या शिखरावर पोचलेला असुनही त्याचा अहंकार, अभिमान हा समूळ नष्ट झालेला नसतो. "मी साधना केली" हा अभिमानच त्याच्या साधनेला काडी लावू शकतो!
त्यामुळे, हा अहंकार किंवा अभिमान माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. या शत्रुला हरवण्यासाठी आपण आपलं मस्तक ज्यानें अहंकाराला, अभिमानाला पायी तुडवलं आहे अशा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करावं!
मस्तक झुकवलं याचा अर्थ मस्तक (अहंकार) याचबरोबर डोळे (चित्त), कान (बुद्धी) आणि वाणी (मन) हेदेखील समर्पित झालं आहे!
हे समर्पण होण्यासाठी 'मी कर्ता' ही भावना सोडून 'राम कर्ता' हा भाव ठेवावा. हा भाव निर्माण होण्यासाठी हातानें काम आणि मुखानें नाम हे सतत सावधानतेनें सांभाळावं! यातूनच चार सुक्ष्म व चार स्थूल करणाला योग्य दिग्दर्शन होऊन खरा परमार्थ साधेल!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏
Tuesday, February 13, 2018
प्रापंचिकानें शिवरूप होण्यासाठी ही शिवोपासना कशी करावी?
शंका- पू. कलावती आई मनशुद्धीसाठी शिवपूजन श्रेष्ठ मानतात. प्रापंचिकानें शिवरूप होण्यासाठी ही शिवोपासना कशी करावी? याबद्दल थोडं सांगावं.
➡
🌿🌿 ।। जय उमा महेश्वर ।। 🌿🌿
श्रीराम!
प्रपंच हा शारिरिक प्रधानतेने करावा; तर परमार्थ हा मानसिक प्रधानतेने करावा. मन हा इंद्रियाचा राजा । त्याची सर्वाआधी पुजा ।। या संतवचनाला प्रमाण मानून अगोदर मनाला शुद्ध सात्विक केलं तर परमार्थ उत्तम होईल आणि त्याच्या अधिष्ठानावर प्रपंच कल्याणकारी होईल.
प्रपंच आणि परमार्थ दोन्ही अंततोगत्वा समाधान देणारे होण्यासाठी मनशुद्धी नितांत आवश्यक आहे. जसे देहाचे अवयव हात, पाय, डोळे इ. आहेत; तसे मनाला शरीर मानले तर मनाचे सुद्धा अवयव आहेत. मनाचे अवयव म्हणजे विचार, कल्पना, भावना, स्मृती इ. या सर्व अवयवांना सात्विक बनवणं म्हणजे मनाची शुद्धी!
ही सर्वांगीण शुद्धी साधण्यासाठी अगोदर मनाची धारणा सुधारली पाहिजे. आज मनाची धारणा ही आहे की, 'मी जीव आहे'. ही धारणा 'मी शिव आहे' अशी वळवली की मन शुद्धीकरणाचा पाया आणि कळस दोन्ही साधेल!
मनशुद्धी संदर्भात पु. कलावती आईंच्या चिंतनाचा आपण संदर्भ दिला आहे. आईंचे आराध्य दैवत "शिव" आहे. आपण केवळ देहाने शिवपूजन करतो, परंतु मनाने शिवाला शिवले की जीव-शिव एकात्म्य साधले जाते, हे पु. आईंच्या चरित्राचं सार आहे, असं मला वाटतं. ते सार ध्यानात घेऊन आपण जर शिवरूप झालो तर सत्य आणि सुंदर काय आहे, याची अनुभूति येईल!
जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला त्याच्या उगमस्थानाचं म्हणजेच शिवाचं स्मरण करून देण्याचा महापर्वकाळ म्हणजे महाशिवरात्र!
प्रत्येक मनुष्य जीवानें शिवरूप होण्यासाठी 'मनापासून' जी उपासना करावी, तिला म्हणतात "शिवोपासना"!
विशेषतः ज्या शिवतत्वाच्या प्रेरणेनें हा जीव प्रपंचांत येतो, त्याच शिवप्रेरणेनें हा प्रपंच सत्यं, शिवम् आणि सुंदरम् करण्याचा संकल्पदिवस म्हणजे ही आजची पावन तिथी!
मग प्रापंचिकानें शिवरूप होण्यासाठी ही शिवोपासना कशी करावी?
शिवोपासना यांत शिव आणि उपासना असें दोन शब्द आले आहेत. शिव म्हणजे परमात्मा आणि उपासना म्हणजे जवळ असणें! तेंव्हा, शिव आपल्या जवळ 'प्रगटावस्थेत' असणें म्हणजेच शिवोपासना!
ही शिवोपासना करण्यासाठी म्हणजेच शिवरूप होण्यासाठी आपण शिवाचरण करायला हवं!
जसं शिवाचं आचरण तसंच आपलं आचरण असावं!
जे शिवाचे गुण तेच गुण आपल्यात जागृत करणे म्हणजे शिवरूप होणें म्हणजेच शिवाचरण. आणि हीच शिवोपासना! मग शिवाचें गुण कोणते?
जेंव्हा, हिमालयानें नारदाला आपल्या कन्येचं, पार्वतीचं भविष्यकथन करायला सांगितलं, तेंव्हा नारदानें सांगितलं हिचं वैवाहिक जीवन आदर्शवत् असेल. प्रत्येक स्त्री हिला माता मानेल!
तिच्या पतीचे गुण सांगा म्हंटल्यावर नारद महर्षीं म्हंटलें,
गुणहीन, मानहीन, माता-पिताविहीन, उदासीन, संशयहीन, जोगी, जटिल, अकाम मन, नगन, अमंगल बेष।
हे तिच्या पतीचें गुण आहेत. हे ऐकून पार्वती आणि तिच्या माता-पितांच्या डोळ्यांत अश्रू आले. माता-पितांच्या डोळ्यांत अश्रू दुःखानें आलें तर पार्वतीच्या डोळ्यांत अश्रू अत्यानंदानें आलें!
वरील वर्णन हे महादेवाचं आहे, हे सर्वांच्या ध्यानांत आलंच होतं. परंतु, इतके दोष असलेल्या वैराग्याला जावई करणं या माता-पितांना चुकीचं वाटत होतं. वरील गुणांवर आणि पार्वतीच्या लक्षणांवर प्रत्येकानें आत्मचिंतन करावं! या गुण-लक्षणांतून प्रत्येक स्त्री पार्वतीरूप आणि प्रत्येक पुरूष शिवरूप कसा होऊ शकतो हे बघुया!
प्रत्येक महिलेनें पार्वती चरित्र चिंतन करावं. पार्वती ही राजमहालातील ऐश्वर्यसंपन्न, सुखी जीवन सोडून एका जटाधारी बैराग्याची पत्नी का बनली? यांतून तिनें काय साधलं याचा विचार करून त्यातून बोध घ्यावा.
नारदाकडून पार्वतीच्या भावी पतीचें दहा गुण ऐकल्यावर ते गुण नसून दोष आहेत, असं पार्वतीच्या पालकांना वाटलं.
खरंतर गुण हा सद्गुण आहे की दुर्गुण हे तो धारण करणाऱ्यावर अवलंबून असतात. उदा. चोरी करणे हा गुण आपल्यात असेल तर तो दुर्गुण म्हंटला जातो. परंतु, तोच गुण श्रीकृष्णाचा सद्गुण म्हंटला जातो. चौराग्रगण्यम् ।
तेंव्हा, गुणहीन, मानहीन, माता-पिताविहीन, उदासीन, संशयहीन, जोगी, जटिल, अकाम मन, नगन, अमंगल बेष।
हे गुण वरकरणी दोष दिसत असले तरी शिव-पार्वती विवाहानें हेंच गुण सद्गुण आहेत, हे कळेल असं आश्वासन नारदानें दिलं....
वरील शिवगुण आपल्यात येण्यासाठी केलेला यत्न म्हणजे "शिवोपासना"!
गुणहीन:
शिव गुणहीन आहेत म्हणजे उपाधीरहीत. निर्लेप मनुष्य हा स्वच्छ व्यक्तिमत्वाचा असतो. आपण स्वतःला तसं गुणावगुणाच्या पलिकडे नेलं पाहिजे..
मानहीन:
मानाची हौस नाही. आपल्या सासऱ्यानें म्हणजे सतीचे पिता दक्ष राजानें सर्व देव, देवता, गंधर्व यांना बोलावलं. परंतु, देवांचा देव म्हणजे महादेवाला, जावयाला बोलावलं नाही, मुद्दाम. तरी त्याबद्दल खंत नाही.
आणि आपण किती लहानसहान गोष्टींच्या मानात अडकतो. तेंव्हा, मानहीन हा गुण आपल्यात आला म्हणजे आपल्यातील जीवत्वाला शिवत्वस्पर्श झालाच!
माता-पिताविहीन:
ज्याच्या आईवडिलांचा पत्ता नाही, कुळ गोत्र माहीत नाही, त्याला आपली मुलगी कोण देईल?
परंतु, शिव हाच उद्गाता, प्रेरक तत्व आहे. या शिवाच्या प्रेरणेनें जीव निर्माण झालें. त्यामुळें, तोच जगद्पिता आहे. भोळाभाव असल्यानें तोच जीवाची माता आहे.
आपण त्याच उद्गात्याचा अंश असल्यानें त्याच्या स्मरणानें जीव शिवत्व पावेल.
उदासिन:
शिव नित्य रामनामीं दंग असल्यानें सुखाची अभिलाषा आणि दुःखाची अनिच्छा याबद्दल उदासिन आहे.
'दुःखेषु अनुद्विग्न मनः । सुखेषु विगतस्पृहः ।।' ही आपली अवस्था होण्यासाठी शिव आदर्श ठेवून त्याच्याप्रमाणें रामनामीं रंगलं पाहिजे!
संशयहीन:
'संशयात्मा विनश्यति' हे वचन ध्यानांत ठेवून संशयहीन म्हणजे भगवंताप्रती पूर्ण विश्वास जागृत करणें म्हणजे शिवरूप होणें. शिव हा विश्वासाचं घनीभूत रूप आहे तर पार्वती ही श्रद्धारूपी मती आहे!
जोगी:
जोगी म्हणजे योगी! कर्म, भक्ती, ज्ञानाचा त्रिवेणी संगम म्हणजे योग. शिव हा श्रेष्ठतम योगी आहे. तसं योगी बनण्यासाठी "राम कर्ता" या तत्वाचं ज्ञान करून प्रत्येक कर्म स्मरणभक्तीनें करावं!
जटील:
जटाभार म्हणजे गुंता. तुम्ही भगवद्प्रेमांत गुंता म्हणजे जशी शिवाच्या जटेतून गंगा उगम पावली, तशी तुमच्या मुखातून नामगंगा वाहू लागेल....
अकाम मन:
मनांत कामवासना नसणें, हा शिवगुण आपल्याला विरागी बनवेल. मर्यादेचं भान करून देणारं मन म्हणजे अकाम मन म्हणजेच शिवमन!
नगन:
नग्न म्हणजे विकारांचं प्रावरण नाही. पूर्ण पारदर्शक. ही flawless transparency आपल्यात येण्यासाठी स्वार्थाचे कपडे सोडून सदाचरणाच्या मुक्तावस्थेत राहणें!
अमंगलवेष:
गळ्यात मुंढमाळा, अंगभर भस्म हा वेष अमंगल असं वरकरणी वाटत असेल. परंतु, या मुंढमाळा, भस्म आपल्याला स्मशानाचं स्मरण करून देतात.
मरणाचें स्मरण असावें। हरिभक्तीसी सादर व्हावें।।
Biology सांगते, आपण प्रत्येक क्षणी मरत असतो. तेंव्हा, प्रत्येक क्षण नामांत जावा, याचं स्मरण हा अमंगलवेष करून देत असतो. आपण सतत मरत असतो. राहिला प्रश्न चितेचा. तर, आपण चिंतारूपी चितेत नेहमीच जळत असतो. त्या चिंतेची राख करून ते भस्म शरीरभर ज्यानें फासलं तो जीवसुद्धां शिवरूप होईल!
वरील दहा गुण आपल्यात येण्याचा प्रत्येक पुरूषानें प्रयत्न करावा! आणि स्त्रीनें पार्वतीला आदर्श मानून आचरण करावं! यांत शिवतत्व जितकं आचरणीय आहे, तितकंच पार्वती मातेचं धर्माचरण महिलांसाठी आचरणीय आहे....
मुळात पार्वतीचा जन्मच शिवपदी प्रेम असल्यानें झाला आहे.
सतीं मरत हरि सन बरु मागा।
जनम जनम सिव पद अनुरागा॥
तेहि कारन हिमगिरि गृह जाई।
जनमीं पारबती तनु पाई॥
आपल्या पतीचा आपल्या माहेरी झालेला अवमान, निंदा सहन न झाल्यानें यज्ञांत सतीनें प्राणांची आहुती दिली. परंतु, त्याअगोदर शिवस्मरण करून वर मागितला की, 'जन्मोजन्मी शिवपदी अनुराग, प्रेम रहावं'!
आणि मग एका विरागीमध्यें अनुराग निर्माण करण्यासाठी हिमालयाची कन्या म्हणून सतीचा पार्वती नावानें जन्म झाला!
सती ही तर्कमिश्रीत मती होती, परंतु अग्नीप्रवेश केल्यावर तीचा तर्क जळून गेला आणि ती सती श्रद्धारूपी मती म्हणजे पार्वती बनली....
प्रत्येक महिलेनें सतीची मती आणि पार्वतीची श्रद्धा अंगी बाणावी. सतीचं पतीवर प्रेम होतं आणि पार्वतीचंही होतं. परंतु, सतीनें नको तिथें तर्क करून रामाला पत्नीविरहानें भटकणारा सामान्य मनुष्य समजून रामभक्त शिवाला दुखावलं. एवढंच नाही तर काही वेळाकरता सीतारूप धारण करून मर्यादा ओलांडली. त्याचवेळीं शिवानें सतीचा मानसिक त्याग केला.
स्त्रीनें मर्यादा ओलांडली तर काय होतं याचं हे एक मोठं उदाहरण!
नंतर पश्चात्ताप झाल्यावर तीच सती श्रद्धारूप बनली आणि जिथे शिव तिथें पार्वती हे सूत्र बनलं!
जिथें रामकथा, जेथें रामनाम तिथें रामभक्त शिव आणि जिथें शिव तिथें पार्वती!
तेंव्हा, प्रत्येक पुरूषानें वरील दहा गुण व प्रत्येक स्त्रीनें मर्यादा धारण केली तर खरी मनशुद्धी होईल व त्यांचं जीवन विश्वासरूपी शिव आणि श्रद्धारूपी पार्वती समान होईल!
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
Friday, February 9, 2018
दासनवमी प्रवचन सेवा - ग्रंथराज दासबोध, कल्याण करी रामराया
दास्यभक्ती यावर चिंतन मांडावं.
🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
रामदास्य करुनि पाहे । सर्व सृष्टी चालताहे ।
प्राणिमात्र रामदास । रामदासीं हा विश्वास ।।
दासाची संपत्ती राम सीतापती ।
जीवाचा सांगाती राम एक ।।
जोपर्यन्त विषयाची आस । तोपर्यन्त नव्हे भगवंताचे दास ॥
तेंव्हा, ज्यांना 'राम' हवा त्यांनी काम जाळावा.
जेणे जाळीला काम तो राम ध्यातो ।।
काम जाळल्याशिवाय 'राम' ध्याता येत नाही. आणि रामाचा ध्यास लागत नाही, तोपर्यंत रामदास होता येत नाही! म्हणून, सोडी संसाराची आस । धरी भक्तीचा हव्यास ।
यांत भगवंताचे दास्यत्व स्विकारण्यासाठी संसार सोडायचा नसून आस सोडायची आहे. जो दास असतो त्याला कसलीही आस नसते.
मुळात धीरगंभीर असलेले पण आता डोळे डबडबलेले राघव म्हंटले, "मला कैकयीनंदन भरताची फार आठवण येतीये. त्याच्या शील आणि सेवाभावाला तोड नाही." संसारातील सर्वोच्च सुखसुविधा, ऐश्वर्य व राजसत्तेत राहून देखील सोडी संसाराची आस । धरी भक्तीचा हव्यास । अशी दास्यभक्ती करणारा अद्वितीय रामदास म्हणजे भरत!
स्वामीसाठी दासाच्या डोळ्यात पाणी येणं ही उच्चकोटीची भक्ती आहे. परंतु, आपल्या दासाची सेवावृत्ती पाहून स्वामीचे डोळे पाणावणं ही अत्युच्चकोटीची दास्यभक्ती आहे, असं वाटतं!
दास्य करी दासाचे । उणे न साहे तयाचे ।।
भगवंत भक्ताची दास्यभक्ती पाहून न राहवून म्हणतो, I am at your service!
हाकेसरशी धावुनी आले, भक्ताचिया ।।
गोरा कुंभाराच्या संगे ।
चिखल तुडवूं लागे अंगे ।
कबिराच्या बैसोनि पाठी ।
शेले विणता सांगे गोष्टी ।
चोखामेळ्यासाठी ।
ढोरे हाकी जगजेठी ।
जनीसंगे दळू लागे ।
सुरवर म्हणती धन्य भाग्ये ।।
आणि ही 'रामदास' पदवी प्राप्त करण्यासाठी आपली कर्तव्यं तर करावीच, परंतु त्यात भगवंताचें अखंड स्मरण राखावें. यासाठी समर्थ म्हणतात,
जो जो भजनासी लागला ।
Tuesday, February 6, 2018
शुद्ध आणि विशुद्ध यात नेमका फरक काय? कृपया सांगावे.
🌹🌷🌹 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷🌹
शंका- शुद्ध आणि विशुद्ध यात नेमका फरक काय? कृपया सांगावे.🙏🏻
➡
श्रीराम! शुद्ध आणि विशुद्ध दोन्ही संस्कृत शब्द आहेत आणि समानार्थी म्हणून वापरले जातात. परंतु, त्यात फरक असेल असं मला वाटतं. शुद्ध म्हणजे पवित्र आणि विशुद्ध म्हणजे विशेष शुद्ध, परमपवित्र!
थोडा खोलात विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की,
शुद्ध म्हणजे पवित्र केलेलं!
विशुद्ध म्हणजे पवित्र असलेलं!
आपल्याला सोने विकायचे असते तेंव्हा सोनार त्यात जर भेसळ असेल तर ते अगोदर शुद्ध करून त्याची किंमत ठरवतो आणि मग त्यानुसार आपल्याला त्याचे पैसे किंवा दागिणा देतो. याचा अर्थ शुद्धी सिद्ध करावी लागतें!
सोनं शुद्ध आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याची चार प्रकारे परिक्षा होते : घर्षण, छेदन, ताप आणि ताडन!
रावणानें सुवर्णमृग पाठवल्यावर ते शुद्ध सोनं आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी रामरायानें त्याचे छेदन करून परिक्षा बघितली. परंतु, बाण लागल्यावर त्याचा नाश झाला. याचा अर्थ ते शुद्ध सोनं नव्हतं! हनुमंत लंकेत गेल्यावर लंका खरंच सोन्याची आहे की नाही हे कळण्यासाठी तिला तापवलं, तर ती जळून गेली. याचा अर्थ लंका शुद्ध सोन्याची नव्हती. त्या तापवण्यातून जे उरलं तेवढंच सोनं! आणि लंकादहनाचा दाह सर्वांना झाला. मात्र दोन अपवाद होते; सीतामाई आणि बिभिषण!
बिभिषण हा शुद्ध होता; तर सीतामाई विशुद्ध होती!
बिभिषणावर प्रक्रिया होऊन तो शुद्ध बनला. ही प्रक्रिया म्हणजे रावणानें त्याला ताडन केले तरी तो कोलमडला नाही. लंकेतील विषयी, कामी वातावरणात तो तापला तरी त्याचं अध्यात्मिक अधिष्ठान हललं नाही. आणि म्हणूनच तो परमार्थाचा अधिकारी बनला! जो त्रिविध तापे पोळला । तोच परमार्थाचा अधिकारी बनला असं समर्थांनी सांगितलं आहे, याचं हे उदाहरण!
सीतामाई ही मुळातच शुद्ध आहे. जे स्वाभाविक शुद्ध आहे त्याला विशुद्ध म्हणतात. आणि जे विशुद्ध आहे, त्याचं नाव भगवंत आपल्याअगोदर लावतो! म्हणूनच आपण "जानकीजीवन, सीताराम" असं म्हणतो!
मिथीलेत रामराया जेंव्हा फुलं तोडण्यासाठी पुष्पवाटिकेत आले, तेंव्हा जानकीला पहिल्यांदाच बघितल्याबरोबर त्यांच्या मनांत अनुराग निर्माण झाला.
काय गंमत आहे बघा! विदेही, विरागी जनकाच्या नगरीत निष्काम राम विरागीचा अनुरागी बनला. याचं कारण तो भक्तीवाटिकेत विशुद्ध प्रेमस्वरूप सीतेच्या समोर आला होता. तिला बघून राघव लक्ष्मणाला म्हंटले, "जिच्या चेहऱ्यावर लौकिक नाही, अलौकिक शोभा आहे, तिला बघून माझं सहजपुनित मन अनुरागी बनलं आहे!"
जासु बिलोकि अलौकिक सोभा ।
सहज पुनीत मोर मनु छोभा ॥
भगवंत हा निर्गुण, निराकार, निर्लेप आहे. परंतु, तो विशुद्ध प्रेमापोटी सगुणसाकार होऊन त्या प्रेमाच्या अधीन होतो!
भगवंत हा स्वतः विशुद्ध असल्याने तो केवळ आणि केवळ विशुद्ध प्रेमच स्विकारतो. जानकी ही भक्तीरूपिनी आहे; भक्ती ही परमप्रेमरूपा आहे; भक्ती ही परमशुद्ध म्हणजे विशुद्ध आहे.
पुष्पवाटिकेत जाण्याच्या आदल्या दिवशी राम-लक्ष्मण मिथीलेत नगरदर्शनाला गेले असतांना सर्व मिथिलावासी रामचंद्राच्या प्रेमांत पडले, परंतु रामराया त्यापासून अलिप्त राहिले. कारण, सर्व मिथिलावासी शुद्ध असतील पण विशुद्ध नाही!
पुष्पवाटिकेत सीतेचं विशुद्ध रूप बघून रामरायाचं परमप्रेमरूप प्रगट झालं. केवळ रामाचंच नाही, जानकीची अवस्था काही निराळी नव्हती!
याठिकाणी हा विषय निघाला म्हणून एक गंमत सांगतो (कदाचित आपल्याला ठाऊक असेल)
राम-लक्ष्मण पुष्पवाटिकेत आले तेंव्हा जानकी देखील गिरिजादेवीच्या पूजेसाठी तिथें आलेली होती. ती पूजेत असतांना तिच्या एका मैत्रिणीने बाहेर येऊन पाहिलं तर राम-लक्ष्मण फुलं तोडतांना दिसले. त्यांना बघून ती भावविभोर झाली आणि मंदिरात येऊन जानकीला सांगितलं की "विश्वामित्र मुनींसोबत जे दोन राजकुमार आले ते सध्या याच वाटिकेत आहेत. काल ज्यांने संपूर्ण नगरजनांना मोहिनी घातली तो मनमोहक राम बाहेर आहे."
याठिकाणी श्रीरामाला 'मोहन' म्हंटलं आहे!
नारदमुनींनी देखील अगोदर रामरायाचं वर्णन केलेलं असल्याने जानकी अधीर होऊन बाहेर आली. त्यावेळी तीने रामरायाकडे बघितलं तर तिला गौरवर्ण कांती असलेला आनंदकंद परमात्मा राजकुमार वेषात दिसला. आणि तिला यात सर्वांत जास्त जे आवडलं ते म्हणजे राघवाच्या मस्तकावर असलेलं मयुरपंख!
राघव फुलं तोडतांना खाली एक मोरपिस दिसलं तर त्यानें ते मस्तकावर धारण केलं!
मोरपंख सिर सोहत नीके ।
गुच्छ बीच बिच कुसुम कली के ।।
(द्वापारयुगात मोरपंख घालण्याची मुहुर्तमेढ भगवंतानें त्रेतायुगांत या पुष्पवाटिकेत केलेली असावी!)
जानकीचं, रामरायाचं मन हे सहजपुनित आहे. सहजपुनित म्हणजे त्याच्यावर संस्कार करून त्याला पुनित, पवित्र करावं लागत नाही, ते मुळातच परमपवित्र म्हणजे विशुद्ध असतं!
ज्याच्यात विकार आहे त्याच्यावर संस्कार करून त्याला शुद्ध करावं लागतं. भगवंत हा निराकार असल्याने तो सगुणसाकार झाला तरी त्याच्यात आपल्यासारखे विकार नसतात, कारण तो विशुद्ध असतो!
आत्मा हा परमात्म्याचा अंश असल्याने तो तत्वतः विशुद्ध आहे. परंतु, वासनेच्या संगे जन्म घेणारा आत्मा देहदृष्टीने अशुद्ध होतो. मग केवळ देहाला शुद्ध करून आत्म्याचं विशुद्धतत्व प्रगट होणार नाही. तेंव्हा देहशुद्धीबरोबर अंतःकरण शुद्ध करायला हवं. ही अंतःकरणाची शुद्धी कशी करावी, हा एक वेगळा चिंतनविषय आहे. त्यातील मन (वाणी) यांवर चिंतन झालं आहे. उर्वरित तीन करणांच्या शुद्धीवर परवा चिंतन करूया!
आजच्या चिंतनातील विशुद्ध अवस्था ही शुद्धीच्या वरची आहे एवढं ध्यानांत ठेवून त्यावर मनन करूया!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
🙏 ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। 🙏
Thursday, February 1, 2018
"हरी" या शब्दावर बोलावं थोडं....
*शंका*- पू. आनंदसागर महाराजांनी रचलेल्या बहुतांश अभंगात शेवटी "हरी" हे नामाभिधान आहे! असे आपण म्हटलात. या संदर्भात "हरी" या शब्दावर बोलावं थोडं दादा....
➡
🌿🌿🌿 *।। हरी ।।* 🌿🌿🌿
श्रीराम!
पु. आनंदसागर महाराजांचे मूळ नाव गोविंद होते. हा गोविंद बालपणापासून रामनामी रत असल्यानें प.पु. सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराजांनी दर्शन व अनुग्रह दिला. या गोविंदाला श्रीमहाराजांनी मध्यप्रदेशात बडवाह येथे नामानुष्ठानासाठी पाठवले. यादरम्यान महाराजांनी पत्र लिहून गोविंदाला "आनंदसागर" नावानें संबोधले. आणि मग गोविंद कुलकर्णी'आनंदसागर महाराज' बनले.
आनंदसागर महाराज बालपणापासून वैराग्यसंपन्न अशी मूर्ती होते. श्रीमहाराजांनी आज्ञा दिल्याने ते प्रापंचिक झाले. परंतु, प्रपंचात राहून, पत्नी, मूल असून अंतःकरण प्रपंचाबद्दल विरागी आणि भगवंताबद्दल अनुरागी ठेवण्याची किमया त्यांना गुरूकृपेनें साधली.
प्रपंचात ठेवून ज्यांनी माझा विषय हरण केला, त्यांची स्तुती करतांना अभंगात आनंदसागर महाराजांनी स्वतःला "हरी" संबोधले.
ज्याच्यातील विषयाचे, वासनेचे हरण होऊन 'आनंदसागर' प्रगट झाला, तो "हरी"!
"हरी" या एका शब्दावर तासभर निरूपण केलं तरी अपुरे ठरेल. याठिकाणी काही आयामांना स्पर्श करूया...
'हरा' शब्दापासून हरी तयार झाला. 'हरा'चा अर्थ आहे राधा! राधा (हरा) आपल्या असीम आणि अनुपम प्रेमाने ज्याचे मन हरते, तो हरी!
*हरा ज्याला वश करून घेते, तो "हरी"!*
हरी म्हणजे विष्णु! परंतु, एकदा श्रीकृष्ण म्हणजे हरी राधेकडे म्हणजे हराकडे आला. दार ठोठावल्यावर राधाने कोण आहे विचारल्यावर कृष्ण म्हंटला, 'मी हरी आहे!'
यावर राधा म्हंटली, 'हरी आहेस तर झाडावर जा, घरात का येतोस?"
याठिकाणी राधेने हरी शब्दाचा वेगळा अर्थ घेतला. हा वेगळा अर्थ आहे 'वानर'!
विष्णूचा एक अवतार म्हणजे नारद महर्षी! भगवंताने लीला करून या नारदाला एकदा वानर बनवले. आणि मूळ हरी असलेला नारद वानर बनल्याने हरी म्हणजे वानर!
नारदाला वानररूप मिळाल्याने त्याची स्वयंवरात उपेक्षा होऊन त्याला राजकुमारीचा वियोग सहन करावा लागला. यावर रागाने नारदाने विष्णुला शाप दिला. त्याचीच परिणती म्हणून रामावतारात सीता-राम आणि कृष्णावतारात राधा-कृष्ण विरह झाला!
असो!
राधेने हरी म्हणजे वानर अर्थ धरून दार उघडण्यास नाकारले. तेंव्हा कान्हा म्हंटला, मी कृष्ण हरी आहे!
तेंव्हा राधा पुन्हा गंमतीने म्हंटली, 'कृष्ण हरी म्हणजे काळं वानर. मग इथे काय करतोय?'
कृष्ण म्हंटला, अगं मी गोपाळ! राधा म्हंटली, मग गाई घेऊन वनांत जा!
कृष्ण म्हंटला, मी घनश्याम! राधा म्हंटली, काळे ढग? मग वर्षाव कर!
अशा प्रकारे भगवंताशी लीला करणारा कुणी अधिकारीच असू शकतो!
जगतलीला करणाऱ्या जगत्पित्यासोबत भक्तीयुक्त अंतकरणाने लीला करणारी राधा म्हणजे हरा! हरा ज्याला अपरिमीत प्रेमाने विवश करते, तो हरी!
असा हरी आणि अशी हरा अनुभवण्यासाठी दोन गोष्टी अनिवार्य आहेत. एक गुरूकृपा आणि दुसरी गुरूसेवा!
या दोन्ही गोष्टी साधण्याचा राजमार्ग म्हणजे अखंडानुसंधान! ते आपण 'हाताने काम आणि मुखाने नाम' या मार्गाने साधूया, हरीरूप म्हणजे आपल्या हृदयातील “आनंदसागर” प्रगट व्हायला वेळ लागणार नाही!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏